Wed, Jun 26, 2019 17:39होमपेज › Kolhapur › पी.एन.- आवाडे संघर्ष संपुष्टात

पी.एन.- आवाडे संघर्ष संपुष्टात

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून एकमेकांपासून दुरावलेले जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे आज तब्बल आठ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले. निमित्त होते नव्या सभागृहाच्या पायाभरणी समारंभाचे. यातून या दोघांच्या दिलजमाईलाही सुरुवात झाली. याच कार्यक्रम आमच्यातील संघर्ष संपल्याची घोषणा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.

पक्षाच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या सभागृहाचा पायाभरणी समारंभ सोमवारी झाला. या कार्यक्रमाला हे सर्व नेते उपस्थित होते. आठ वर्षांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून आवाडे - पी. एन. यांच्यात जोरदार संघर्ष झाला. त्यातून मोठा राडा झाला व काही कार्यकर्ते जखमी झाले. तेव्हापासून एकमेकांना संधी मिळेल तिथे शह देण्याचा प्रयत्न या दोघांत सुरू होता. आजचा कार्यक्रम मात्र त्याला अपवाद ठरला.

या कार्यक्रमाला प्रकाश आवाडे आले त्याचा आनंद झाला, त्यांनी यातून पक्षाचे काम सुरू केल्याचे सांगत माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी या विषयाला हात घातला. आज मला खर्‍या अर्थाने पक्षाचा शहराध्यक्ष असल्याचे वाटते, असे सांगत शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी, आता तुम्ही नेते घट्ट रहा, तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत. सभागृह कमी पडेल, अशी गर्दी यापुढे होईल, आज पक्षातील गटबाजी संपल्याचे सांगितले.

सुरुवातीला बोलणार नाही असे म्हणणारे प्रकाश आवाडे शेवटी बोलले. ते म्हणाले, आजचा कार्यक्रम हा महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या कारणांंनी नेत्यांची तोंडे वेगळ्या दिशेला झाली. त्यातून संघर्ष निर्माण झाला व तो विकोपाला गेला. त्याचा परिणाम पक्षाचे व कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले. पक्ष व नेतेही निस्तेज झाले. आपल्या भांडणात कार्यकर्ते नाराज झाले, त्यांच्यातही संघर्ष उभा राहिला. त्यामुळे कधीकाळी सर्व आमदार आणि खासदार काँगे्रसचे असलेल्या या जिल्ह्यात आज एकही आमदार, खासदार नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

ते म्हणाले, काहींनी या वादात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधूनमधून संभाषण होते; पण प्रत्यक्ष एकत्र कधी आलो नव्हतो. हे कुठेतरी थांबावे, अशी मनापासून इच्छा होती. कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असेल, तर आपण एकत्र असले पाहिजे, अशी भावना होती.

फज्जा शिवण्यासाठी नेत्यांतील डावपेच, एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा, यातून कोणीच फज्जा शिवला नाही, असे सांगून आवाडे म्हणाले, हा संघर्ष फार झाला, त्यातून फार भोगले. सगळेच पक्षात असूनही एकमेकांविरोधात होतो; पण आता हे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. म्हणूनच यापुढे संघर्ष न करता एकत्र राहू, त्यातून पक्ष मजबूत करू. आपण एकत्र राहिलो तर जिल्हा कुठे जातो, ते बघूच. आता एकत्र आलो तर त्याचा रिझल्ट द्यायला पाहिजे, येणार्‍या निवडणुकीत तो देऊ. यापुढे हा संघर्ष संपला.

सतेज पाटील यांच्यामुळे समेट...
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट झाली होती. त्यावेळी पाटील यांनी चव्हाण यांना कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांत असलेला वाद मिटल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी आणि नंतरही पाटील यांनी जिल्ह्याच्या नेत्यांतील वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. आज कार्यक्रमाला ते नाहीत म्हणून कुणी वेगळा अर्थ काढू नये. वास्तविक सतेज पाटील यांच्यामुळेच हा वाद मिटल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

आमचीही तिथे फरफटच
जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडेंना तिकीट नाकारले. आवाडे गटाच्या कुणालाही तिकीट द्यायचे नाही ठरले. त्यामुळेच आम्ही ताराराणी आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवली. याच आघाडीची गरज अध्यक्ष निवडीत मग कशाला लागली? आम्ही तिकडे गेलो; पण तिथेही आमची फरफटच सुरू असल्याची कबुली प्रकाश आवाडे यांनी दिली.