Sat, Feb 16, 2019 13:32होमपेज › Kolhapur › जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर भाविक

जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर भाविक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

डोक्यावर जोतिबाची चांदीची मूर्ती, काही भाविकांच्या खांद्यावर सासनकाठी, मुखात अखंडपणे जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाईच्या नावानं चांगभलं, अशा जयघोषणात सोमवारपासून भाविक जोतिबा डोंगराकडे रवाना होत आहेत. डोंगराकडे रवाना होण्यापूर्वी पंचगंगा नदीत अंघोळ करून जाण्याची परंपरा अनेक भाविकांकडून जपली जात आहे. यामुळे पंचगंगा घाटावर हळूहळू भाविकांची वर्दळ वाढू लागली आहे. मंगळवारी कर्नाटकातील बेळगाव, खानापूर या भागातील भाविकांचा ताफा सासनकाठी, बैलगाडीसह जोतिबा डोंगराकडे रवाना झाला. 

बेळगाव, खानापूर या परिसरात भाविकांनी जोतिबा यात्रेला पायी येण्याची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर पोहोचण्यासाठी गेले पाच दिवस चालत असलेले हे भाविक मंगळवारी जोतिबा डोंगरावर पाहोेचले. एप्रिलपर्यंत हे भाविक डोंगरावर वास्तव्यास असणार आहेत. 

जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस 31 मार्च आहे;  पण 30  व 31 मार्च असे दोन दिवस कोल्हापूर महापालिका परिवहन समितीच्या वतीने भाविकांसाठी जोतिबा मंदिर परिसरातील जवळच्या मार्गावर मोफत बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 40 बसेस तैनात करण्यात येणार आहेत, असे केएमटीच्या वतीने सांगण्यात आले. ही बस सेवा दानेवाडी फाटा ते जोतिबा मंदिर आणि जोतिबा मंदिर ते गिरोली फाटा या मार्गावर केएमटीच्या बसेस धावणार आहेत.

देशातील तीन राज्यांतील भाविक असलेल्या व चैत्र पौर्णिमेला होत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. मागील अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने भाविकांना पिण्याचे पाणी, औषधोपचार, शौचालयाची व्यवस्था देण्यासाठी जोरदार नियोजन केले जात आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, devotees,  Panchganga ghat, Jyotiba Yatra


  •