Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Kolhapur › महाआरतीद्वारे पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीचा निर्धार

महाआरतीद्वारे पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीचा निर्धार

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

नर्मदा आणि गंगा परिक्रमा या धर्तीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि आ. अमल  महाडिक व सौ. शौमिका  महाडिक दाम्पत्याने राबविलेल्या नमामी पंचगंगे या पंचगंगा परिक्रमा उपक्रमांतर्गत गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीची महाआरती करून पंचगंगा प्रदूषणमुक्‍त करण्याचा निर्धार करण्यात आला.  धार्मिक आणि उत्साही वातावरणात शेकडो कार्यकर्त्यांनी महाआरतीत सहभाग नोंदवत पंंचगंगा प्रदूषण मुक्‍तीसाठी द‍ृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले. पंचगंगा परिक्रमा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

आ. अमल महाडिक आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाटावर हजेरी लावून महाआरती केली. यावेळी जलचरांच्या प्रतिकृती करून नदीत अर्पण करण्यात आल्या. सायंकाळच्या प्रसन्‍न वातावरणात आणि शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने घाट उजाळून निघाला. करवीर पिठातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आरती आणि जलचरांच्या प्रतिकृती पंचगंगा घाटावर आणल्या. विधीवत पूजन आणि धार्मिक कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली. तर महाआरतीनंतर होमहवन करण्यात आले. 

तत्पूर्वी, झालेल्या छोटेखानी समारंभात बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या, सामाजिक कामे खूप केली. मात्र, गेली 25 ते 30 वर्षे विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही पंचगंगा प्रदूषणमुक्‍त होऊ शकली नाही. त्यामुळे गंगा नदीच्या धर्तीवर पंचगंगेसाठी नमामी पंचगंगे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास धार्मिकतेची जोड देऊन पक्ष व राजकारणविरहीत या उपक्रमात पंचगंगेविषयी मनात आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमास लोकसहभाग मिळाल्यास पंचगंगा प्रदूषणमुक्‍ती दूर नाही. पूजा, परंपरा, परिक्रमा आणि पर्यटन या माध्यमातून प्रयत्न केल्यास पंचगंगेस गतवैभव प्राप्‍त होऊन पंचगंगा अमृतसंजीवनी झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. महाडिक यांनी केले. 

यावेळी आ. अमल महाडिक, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी,  सोनाली महाडिक, मंगल महाडिक, नवोदिता समरजितसिंह घाटगे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, बाबा पार्टे, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, हातकणगंले पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, अंबरिश घाटगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रा. शिवाजी गावटे यांनी प्रास्ताविक केले. उमाकांता राणिंगा यांनी पंचगंगेची विस्तृत माहिती सांगितली.