होमपेज › Kolhapur › इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी

इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी

इंधन दरवाढ व अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  या मोर्चात  कोल्हापूर जिल्ह्यातील वीसहून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 कावळा नाका येथून मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.  

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किमती कमी होऊनही  इंधनाचे दर कमी झालेले नाहीत. केंद्र व राज्य शासनाचे विविध कर व अतिरिक्‍त सेस यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत  इंधनाचे दर हे 6 ते 9 रुपयांनी जास्त आहेत ते कमी करावेत व इंधनाचा जीएसटीत समावेश करावा, अशी मागणी केली. याशिवाय थर्ड पार्टी प्रिमियममध्ये 26 टक्के वाढ झाली आहे.  जुन्या वाहनांच्या किमतीऐवढा प्रिमियम भरावा लागत आहे. टोल टॅक्समध्ये 18 टक्के दरवाढ झाली आहे.  रस्त्यासाठी होम टॅक्स, ऑल इंडिया टॅक्स, डिझेलवर प्रतिलिटर सेस, टोल टॅक्स असे चार प्रकारचे कर घेतले जातात. केवळ कर घ्यायाचा; पण सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत.  वाहनाच्या वजनावर वाहनांचा महिन्याचे उत्पन्‍न फिक्स करून कर लावला जातो. याबाबतचे विधयक रद्द केले पाहिजे. वर्षामध्ये वाहन केवळ दोनशे दिवस चालते. 

कोल्हापूर, पूणे व मुंबई महामार्गावर ट्रकना थांबण्यासाठी ट्रक टर्मिनल नाही. त्यामुळे महामार्गावर 70 किलोमीटर अंतराने ट्रक टर्मिनल करावेत व तावडे हॉटेल परिसरात ट्रक टर्मिनससाठी आरक्षित असणार्‍या जागेवर वाहन तळ उभे करावे. गौणखनिज वाहतूक दारांवरही चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. वाळू उत्खनन तसेच साखर कारखान्यातील हमालांकडून होणार्‍या पिळवणुकीबाबतही योग्य त्या सूचना करण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, प्रकाश पाटील, महादेव भोसले  व विविध संघटनांचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.