Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Kolhapur › जोतिबा मंदिर व्यवस्थापनासाठी नवीन प्राधिकरणाची निर्मिती करण्याची मागणी 

जोतिबा मंदिर व्यवस्थापनासाठी नवीन प्राधिकरणाची निर्मिती करण्याची मागणी 

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:14PMजोतिबा : वार्ताहर 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाकडून जोतिबा मंदिर काढून घेऊन शासन जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविक यांच्या सहभागाने जोतिबा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नवीन प्राधिकरणाची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्याचा जोतिबा ग्रामस्थांच्या वतीने  ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

जोतिबा मंदिरातून देवस्थान समितीला काहीच उत्पन्न मिळत नाही. मंदिरामध्ये मिळणारे उत्पन्न हे जोतिबा डोंगरावरील पुजारी समाजाला मिळत आहे, यामुळे जोतिबा मंदिर व्यवस्थापनासाठी महालक्ष्मी मंदिरातून मिळणार्‍या उत्पन्नातून खर्च करावा लागत आहे, असे कारण देऊन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जोतिबा डोंगर येथे पगारी पुजारी नेमण्याचा नुकताच एक ठराव करण्यात आला आहे. या ठरावामुळे जोतिबा डोंगर येथील गुरव समाज्यामध्ये नाराजी आहे.

या पार्श्‍वभूमीवर झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकत्रित येऊन देवस्थान समितीच्या ठराव विरुद्ध निषेध व्यक्त करून जोतिबा मंदिर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या व्यवस्थापानाकडून काढून शासन, जोतिबा डोंगरावरील गुरव समाज आणि भाविक यांच्या सहभागाने जोतिबा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी नवीन प्राधिकरणाची निर्मिती करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीच्या जोतिबा डोंगर येथे पगारी पुजारी नेमण्याच्या ठरावाला निषेध व्यक्त करण्याचा सुद्धा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे,  विष्णुपंत दादर्णे, शिवाजीराव सांगळे, अजित भिवदर्णे, कृष्णात शिंगे, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ, तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.