Sat, May 30, 2020 05:27होमपेज › Kolhapur › दहा टोळ्यांतील १२२ सराईत होणार तडीपार

दहा टोळ्यांतील १२२ सराईत होणार तडीपार

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:12AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शहरासह उपनगरातील सराईत टोळ्या व फोफावलेल्या काळ्या धंद्याचे साम्राज्य मोडीत काढण्यासाठी 10 नामचिन टोळ्यांतील 122 गुन्हेगारांना कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून तडीपारीसाठी पोलिस अधीक्षक व करवीर प्रांताधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. दारूची तस्करीप्रकरणी मोरेवाडी (ता. करवीर) येथील दोघांवर (एमपीडीए) झोपडपट्टीदादा प्रतिबंधात्मक कारवाईंतर्गत जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारी टोळ्यांच्या उच्चाटनासाठी उगारण्यात येणार्‍या कारवाईच्या बडग्यामुळे येथील सराईत गुन्हेगारी टोळ्यासह काळेधंदेवालेही धास्तावले आहेत. तडीपार व ‘एमपीडीए’च्या प्रस्तावांवर जलदगतीने सुनावणी होऊन समाजकंटकांना चाप लावण्यासाठी वरिष्ठ स्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. 

फाळकूटदादासह मटकाकिंग, दारू तस्कर, जुगारी अड्ड्यांचे मालक, खासगी सावकारासह संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांचाही प्रस्तावित यादीत समावेश असल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

मटकाकिंग विजय पाटीलसह साथीदारांवर यापूर्वीही तडीपारीचा बडगा उगारण्यात आला होता. प्रस्तावित यादीत मटकाकिंगसह आणखी सहाजणांचा समावेश आहे. याशिवाय बशीर अब्बास पटेकर, अजित संपत बागल, राहुल बापू गायकवाड, आयुब खुदबुद्दीन जमादार, बबन लाला कवाळे, सलिम यासिन मुल्ला या म्होरक्यासह 81 साथीदारांचा प्रस्तावित यादीत समावेश करण्यात आला आहे.  

याशिवाय महाराष्ट्र पोलिस कायदा 56 व 57 कलमान्वये 40 सराईतांविरुद्ध प्रांताधिकार्‍याकडे तर दारू तस्करीप्रकरणी मनोज मोहन मिणेकर व प्रकाश बागडे (रा. मोरेवाडी) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. शहर व उपनगरात दहशत माजविणार्‍या सराईत टोळ्यांच्या कारनाम्याची कुंडली एकत्रित करण्यात येत आहे. आर्थिक पिळवणूक करणार्‍या खासगी सावकारी टोळ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगून दहशत माजविणार्‍या गुन्हेगाराविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, असेही डॉ. अमृतकर यांनी सांगितले.