होमपेज › Kolhapur › राधानगरीत ‘काजवा महोत्सवा’ला गर्दी 

राधानगरीत ‘काजवा महोत्सवा’ला गर्दी 

Published On: May 28 2018 1:42AM | Last Updated: May 27 2018 11:19PMराधानगरी : प्रतिनिधी

राधानगरीच्या निसर्गाच्या कोंदणात राऊतवाडीचा फेसाळणारा धबधबा, दुर्मीळ फुलपाखरे व पाठोपाठ आता काजवा महोत्सवाने भर टाकली आहे. काजवा महोत्सवाच्या निमित्ताने राज्यासह परराज्यांतील पर्यटकांनी हजेरी लावल्याने राधानगरीचा काजवा महोत्सव परराज्यांतही चमकत आहे. आठ दिवसांत सुमारे पंचवीस हजारांहून अधिक पर्यटकांनी काजवा महोत्सवास भेट दिली आहे. 

लाखोंच्या संख्येने असलेल्या कजव्यांचा थवा रोज कसा प्रकाशोत्सव साजरा करतो याची प्रचिती या उपक्रमातून पर्यटकांना मिळाली. काजवा महोत्सव आयोजित करून राधानगरी नेचर क्लबच्या सदस्यांनी पर्यटकांना नैसर्गिक मेजवानी उपलब्ध करून दिली. फेजिवडे जंगल परिसरात गर्द झाडीवर काजव्यांचा चमचमता आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.काजवा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्या हस्ते व पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सरपंच कविता शेट्टी, सचिन पालकर, डॉ. सुवर्णा खड्डककर, प्रा. ए. डी. कुंभार यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर आलेल्या पर्यटकांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर राधानगरी धरणाशेजारील फेजिवडे जंगल परिसरात लखलखणार्‍या काजव्यांच्या अनुभूतीचा आस्वाद घेतला.