होमपेज › Kolhapur › जोतिबा डोंगर गर्दीने फुलला

जोतिबा डोंगर गर्दीने फुलला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असून, भाविकांनी डोंगर फुलून गेला आहे. पंचगंगा घाटावरही भाविकांची मांदियाळी आहे. सलग सुट्ट्यांची संधी साधत अबालवृद्धांसह बुधवारपासूनच हालगी, घुमकं, कैताळच्या निनादात, जोतिबाचा जयघोष करत भाविक जोतिबा डोंगराकडे रवाना होत आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एस.टी.महामंडळाने जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. दर अर्ध्या तासाला जोतिबा डोंगराकडे एस.टी. रवाना केली जात आहे. 

श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा हे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा दोन दिवसांवर आली असताना राज्याच्या कानाकोपर्‍यातून त्याचबरोबर बेळगाव, चिक्‍कोडी, रायबाग यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक मानाच्या सासनकाठ्यांसह जोतिबा डोंगराकडे रवाना होऊ लागले आहेत. हे सर्व भाविक जोतिबा डोगरावर जाण्यापूर्वी पंचगंगा घाटावर विश्राती घेऊन स्नान करून पुढे यात्रेसाठी रवाना होत आहेत. 

खासगी आराम बसेस, खासगी वाहनांसह बैलगाडीतून भाविकांची वर्दळ सुरू आहे. पायी चालत जाणार्‍या भाविकांची संख्याही मोठी आहे. भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने पंचगंगा घाटावर गर्दी होत आहे. आराम बसेस, एस.टी. बसेस खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, अनेक भाविकांनी पंचगंगा घाटावर स्नान केल्यानंतर सासनकाठीसह अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी मंदिराच्या आवारात सासनकाठी नाचवून यात्रेचा आनंद लुटला.

आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्‍निशमन दलाची आवश्यकता एस.टी.च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने गुरुवारपासून खास यात्रेसाठी बसेस सोडण्यात येत आहेत. यासाठी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. महापालिकेने पंचगंगा नदीघाटावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय केली आहे, तर भाविकांसाठी फिरत्या  शौचालयाची सोय करण्यात आली आहे. आरोग्य पथकासह अन्य सुविधा तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

यात्रा एक दिवसावर आली असताना पंचगंगा घाटावर महिलांसाठी कपडे बदलण्याची अद्याप व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच भाविकांना नदीच्या पाण्याची खोली माहीत नसल्याने एखादा अपघात होऊ नये यासाठी अग्‍निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाची नितांत गरज आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत ही व्यवस्था नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

शिवाजी पुलावर माहिती दर्शक फलक आवश्यक

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येत असतात. कोल्हापुरातून जोतिबाकडे जाण्यासाठी पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल एकमेव मार्ग आहे. या पुलास 140 वर्षे झाली असून, स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार पुलावरून अवजड वाहतूक धोकादायक ठरू शकते. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी पुलावरून यात्राकाळात होणारी वाहतूक लक्षात घेता या पुलावर विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

पुलावर वाहने सावकाश हाका, अवजड वाहतुकीस बंद, अशा प्रबोधनात्मक फलकाची गरज आहे. याबरोबरच पंचगंगा घाटावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने भाविकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी महापालिका प्रशासनाने घाटावर पाणी खोल आहे, पाण्याचा अंदाज घेऊनच नदीत उतरा, या आणि अशा प्रबोधन फलकांची गरज आहे. यात्रा तोंडावर आली तरी याबाबतचे फलक कुठेच आढळत नसल्याने प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Jyotiba Mountain, Jyotiba yatra, 


  •