Mon, Jun 17, 2019 00:17होमपेज › Kolhapur › निखिल खाडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा

निखिल खाडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:07AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

येथील राजाराम माने आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला व सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत असलेला संशयित आरोपी निखिल खाडे याच्याविरुद्ध रविवारी शिरोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खाडे याने आपणास पोलिसांचे नाव सांगून फसवणूक केल्याची फिर्याद दीपक संभाजी कांबळे (रा. घालवाड) याने दिली आहे.  दुसरा  संशयित  शशिकांत साळुंखे याच्यावरही सीपीआरमध्ये उपचार केले  असून, त्याची गावभाग पोलिस कोठडीत रवानगी केल्याची माहिती शिरोळ पोलिस व तपास यंत्रणेने  दिली.

संशयित खाडे याने घालवाडमधील दीपक कांबळेकडून मोबाईल घेऊन देतो, अशी बतावणी करून वेळोवेळी 32 हजार रुपये घेतले. पैशाची मागणी केली असता पोलिसाचे नाव सांगून त्याने फसवणूक केली. याबाबत कांबळे याने 14 नोव्हेंबर रोजी  पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार  संशयिताचा शोध घेतला आला असता तो मिळून आला नाही, असे सहा.पोलिस निरीक्षक समीर गायकवाड यांनी सांगितले.

शिरोळ येथे 5 डिसेंबरपासून गाजत असलेला माने आत्महत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निखिल खाडे याची ही प्रकृती स्थिर आहे. याच प्रकरणातील दुसरा संशयित शशिकांत साळुंखे याला शनिवारी उलटी व अन्य  कारणावरून सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. 

शिरोळ पोलिस पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात?

दीपक कांबळे याने  फसवणूक केल्याचा अर्ज 14 नोव्हेंबरला शिरोळ पोलिस ठाण्यात दिला होता. या दिवशी  कॉ. भूजिंगा कांबळे  ठाणे अंमलदार  होते. या दरम्यान  खाडे याचा पोलिस ठाण्यात वावर होता. त्याच्यावर त्याच वेळी  कारवाई का केली नाही. त्यामुळे तक्रार अर्जातील फसवणूक प्रकरणामुळे शिरोळ पोलिस पुन्हा चौकशी फेरीत येणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.