Mon, Jun 17, 2019 01:05होमपेज › Kolhapur › जिल्ह्याचा 11,282 कोटींचा पतपुरवठा आराखडा

जिल्ह्याचा 11,282 कोटींचा पतपुरवठा आराखडा

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्याच्या 2018-19 चा 11 हजार 282 कोटी रु. चा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. या वर्षी कृषी कर्जाचे उद्दिष्ट 2315 कोटी रुपये असून सर्व बँकांनी मिळून ही उद्दिष्टपूर्ती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. बँक ऑफ इंडिया या जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने जिल्ह्यासाठी सन 2018-19 साठी करण्यात आलेल्या 11 हजार 282 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

सुभेदार म्हणाले,  जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात 2315 कोटी रुपयांचे उद्दिष्ट कृषी कर्जासाठी आहे. अधिकाधिक उद्दिष्टपूर्ती खरीप हंगामात करण्यासाठी बँकांनी प्रयत्नशील राहावे. या आराखड्याची अंमलबजावणी करताना प्रधानमंत्री जन-धन योजनेची अंमलबजावणी, नवीन रोजगार, उद्योग, व्यवसाय निर्मितीवर भर, सोलर पंप सेट योजना, पीक विमा योजना राबविणे, आर-सेटी द्वारा 1000 युवक-युवतींना प्रशिक्षित करणे, अल्पसंख्याकांना एकूण कर्ज वाटपाच्या 15 टक्के कर्ज वाटप करणे या पाच कलमी कार्यक्रमावर भर द्यावा.

या आराखड्यात प्राथमिक क्षेत्रासाठी 7648 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पेक्षा एकूण 12 टक्क्यांनी या आराखड्यात वाढ करण्यात आल्याचे बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने यांनी सांगितले. प्रत्येक वर्षी या आराखड्यात वाढ करण्यात येते. मात्र, यावर्षी कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढावी यासाठी 12 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन करण्यात आले आहेत.  वर्ष 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 2 लाख 54 हजार 530 शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून या शेतकर्‍यांना 2 हजार 83 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. शेती, लघु उद्योग तसेच बचतगटांसाठी देण्यात येणार्‍या कर्ज पुरवठा मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकांकडे कर्ज प्रकरण पाठविताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहनही माने यांनी केले.

यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरिश जगताप, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, नाबार्डचे कोल्हापूरचे सहायक प्रबंधक नंदू नाईक, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक किशोर कुमार यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित 
होते.