Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Kolhapur › पाचगावात वृद्ध दाम्पत्यास घरात घुसून लुटले

पाचगावात वृद्ध दाम्पत्यास घरात घुसून लुटले

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 1:35AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पाचगाव (ता. करवीर) येथील जगतापनगरात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्यास जीवे मारण्याची धमकी देत साडेसोळा तोळे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली. आठ दिवसांपूर्वी राहत्या घरी ही घटना घडली. गेले आठ दिवस या दाम्पत्याला वेळोवेळी फोनवरून धमकी देण्याचा प्रकार होत असल्याने त्यांनी पोलिसांना कळविले नाही. या लुटीनंतरही पैशासाठी त्यांना वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर त्यांनी करवीर पोलिसांना याची माहिती दिली. 

समाजकल्याण विभागातून सेवानिवृत्त झालेले शिवलिंग खतकल्‍ले (वय 73) हे पत्नी लीला खतकल्‍ले यांच्यासोबत जगतापनगरात राहण्यास आहेत. 30 नोव्हेंबरला शिवलिंग खतकल्‍ले घरात नसताना एका अनोळखी इसमाने घरात येऊन चौकशी केली होती. 3 डिसेंबर रोजी शिवलिंग खतकल्‍ले व त्यांची पत्नी रात्री दहाच्या सुमारास जेवत असताना बेल वाजली. त्यांनी दरवाजा उघडला असता दोन अनोळखी इसम थेट घरात घुसले.

जीवे मारण्याची धमकी

त्यांनी शिवलिंग खतकल्‍ले यांची गळपट्टी धरून 30 लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे नसल्याचे सांगितल्याने सर्व दागिने द्या, नाही तर जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. खतकल्‍ले यांनी कपाटातील साडेसोळा तोळे दागिने व रोख 80 हजार रुपये या चोरट्यांच्या स्वाधीन केले. त्या चोरट्यांनी खतकल्‍ले व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले.

पैशाची मागणी

लुटीच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून खतकल्‍ले यांना फोन आला. संबंधिताने ‘पैशाची जोडणी झाली की नाही’, अशी विचारणा केली. घाबरलेल्या खतकल्‍ले दाम्पत्याने याची माहिती मंगळवार पेठेत राहणार्‍या राजशेखर खतकल्‍ले यांना दिली.

शिवलिंग यांचे भाऊ व पुतणे घरात असताना रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा अज्ञाताने फोनवरून शिवलिंग कोठे आहे, अशी विचारणा केली. यानंतर फोन कट झाला.या जबरी चोरीची नोंद सोमवारी करवीर पोलिसांत झाली. चोरट्यांनी सुमारे चार लाखांचे दागिने व रोख 80 हजार लुटल्याची नोंद करण्यात आली.