Thu, Aug 22, 2019 03:49होमपेज › Kolhapur › जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार : पालकमंत्री

जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार : पालकमंत्री

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:35AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात बुधवारी बंद काळात झालेल्या घटनांतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी पोलिस व नागरिकांची गुरुवारी त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. गरज भासल्यास मुंबईच्या रुग्णालयात उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

भीमा-कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ कोल्हापुरात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. बंददरम्यान झालेल्या दगडफेक, लाठीमारात दोन पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसह 70 जण जखमी झाले. यापैकी काहींवर सीपीआरमध्ये तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. काहींना औषधोपचार करून बुधवारीच घरी सोडण्यात आले.

सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची आज पालकमंत्री पाटील यांनी भेट घेतली. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या सौरभ सोरप आणि अविनाश कांबळे यांची त्यांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी सर्वसाधारण विभागात उपचार घेणार्‍या पाच रुग्णांचीही भेट घेतली. 

यानंतर ना. पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. जखमींना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, गरज असेल तर मुंबईतील रुग्णालयात जखमींवर उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगरचे अध्यक्ष संदीप देसाई, विजय जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस.पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ.वसंतराव देशमुख, न्यूरोसर्जन डॉ. अनिल जाधव आदी उपस्थित होते.