Tue, Apr 23, 2019 18:10होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील सरिता मापन केंद्रांची अवस्था बिकट

जिल्ह्यातील सरिता मापन केंद्रांची अवस्था बिकट

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:49AMआजरा ः ज्योतिप्रसाद सावंत

पावसाचे प्रमाण, पाण्याचा वेग व पाण्याची पातळी मोजण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हाभरातील सरिता मापन केंद्रांची अवस्था बिकट झाली आहे. संबंधित केंद्रांतील खलाशीपदावर काम करणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुमारे 15 वर्षे खलाशी पदे भरण्यात न आल्याने बहुतांशी केंद्रांना कुलूप लागले आहे. अत्याधुनिक स्वयंचलित ‘रडार’ यंत्रणेमुळे अद्ययावत माहिती मिळू लागल्यानेही या यंत्रणेचा फटका सरिता मापन केंद्रांना बसला आहे.

जिल्ह्यामध्ये पाणी प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने 14 ठिकाणी शासनाने सरिता मापन केंद्रे उभी केली आहेत. पर्जन्यमापनाचे प्रमुख काम या सरिता मापन केंद्रांद्वारे केले जात होते. शासनाने लाखो रुपयांची यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली होती. त्यांच्या देखभालीसाठी व निगराणीसाठी खलाशी नेमण्यात आलेले होते. केंद्रांमार्फत जिल्ह्यातील हवामानविषयक नोंदी दररोज सकाळी व संध्याकाळी घेणे, केंद्रांवर बाष्पीभवन, स्वयंचलित पर्जन्यमान, साधे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रतादर्शक, वायुवेग मापन, वायू दिशादर्शक, सूर्यप्रखरता मापक, तापमान मोजमाप करणारी अशी विविध यंत्रणा कार्यान्वित होती. 

ठिकठिकाणच्या नदीकाठी पाण्याची घनता व पूर प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी डिझेल इंजिनवर चालणारा रोप-वेच्या धर्तीवर पाळणा उभारण्यात आलेला होता. नदीला जेव्हा पाणी येते तेव्हा नदीतील पाण्याची उंची, प्रवाहाचा वेग आदी मोजमापे तेथील यंत्रणेद्वारे घेतली जात होती. या केंद्रांमार्फत हवामानविषयक अहवाल दर महिन्याला नाशिक व पुणे येथील जलसंपदा विभागाला कळवला जात होता. मात्र, आता सर्वच क्षेत्रांत झालेल्या डिजिटल क्रांतीचा फटका या सरिता मापन केंद्रांना बसला आहे. सरिता मापन केंद्रांचे महत्त्व रडार यंत्रणेमुळे कमी होऊ लागले आहे. 

यामुळे 14 केंद्रांवरील ज्या-ज्या ठिकाणचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्या सरिता मापन केंद्रांवर पुन्हा कर्मचार्‍यांची नियुक्ती झालेली नाही. काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. अशा कर्मचार्‍यांनी आपणाला सेवेत कायम करून घ्यावे, असा पवित्रा घेतल्याने शासनाने सावध भूमिका घेत सरिता मापन केंद्रेच बंद ठेवल्याचे समजते.