होमपेज › Kolhapur › मधुमेहाच्या नव्या निकषाविषयी संभ्रम?

मधुमेहाच्या नव्या निकषाविषयी संभ्रम?

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:28AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

मधुमेही रुग्णांच्या उपचार पद्धतीकरिता जागतिक पातळीवर जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी सध्या भारतीय मधुमेह तज्ज्ञांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर रोगनिदानासाठी रुग्णाच्या रक्‍तातील साखरेचे सरासरी प्रमाण थोडे शिथिल करण्यात आले आहे. यामुळे मधुमेही रुग्णांच्या उपचारादरम्यान गुंतागुंत निर्माण होईल. शिवाय, गेली अनेक दशके रोगनिदानानंतर उपचारासाठी निश्‍चित केलेला उपचारपद्धतीचा क्रमही (प्रोटोकॉल) विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्‍त होत आहे.

मधुमेही रुग्णाच्या रोगाची पातळी (स्टेज) निश्‍चित करून उपचार करण्याची पद्धत आहे. यासाठी रुग्णाच्या रक्‍तातील मागील 90 दिवसांच्या सरासरी साखरेचे प्रमाण (एचबीए1 सी) याचा आधार घेतला जातो. हे प्रमाण 6.5 पेक्षा कमी असावे, असा वैद्यकीय दंडक आहे. तर 6.5 च्या पुढे गेले, तर रुग्णाला मधुमेही समजून त्यावर औषधोपचार सुरू केले जातात. सर्वसाधारणपणे हे प्रमाण 9 पेक्षा अधिक गेले, तर रुग्णाला इन्शुलिन चालू करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, नुकतेच अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स या संस्थेने या निकषात बदल करणारा अहवाल दिला आहे. यामध्ये हे प्रमाण 7 ते 8 च्या दरम्यान असल्यास मधुमेहाचे उपचार सुरू करावेत, असे नमूद केले आहे. 

अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशिअन्सने जाहीर केलेल्या निकषामुळे भारतात मधुमेहाकडे पाहण्याचा द‍ृष्टिकोन बदलेल, निकष शिथिल केल्यामुळे रुग्ण बेसावध राहतील आणि उशिरा उपचार सुरू केल्याने आरोग्याची गुंतागुंतही वाढण्याचा, सोबत उपचाराचा प्रोटोकॉल बदलण्याचा धोका मधुमेहतज्ज्ञांनी वर्तविला आहे. याला कारण देताना काही ज्येष्ठ मधुमेही तज्ज्ञांनी भारतातील मेदयुक्‍त पदार्थ खाण्याच्या जीवनशैलीकडे लक्ष वेधताना सध्या प्रचलित असलेले निकषच योग्य असल्याचे म्हटले आहे, तर या क्षेत्रातील सेवाभावी संस्थांनी नव्या निकषांचा पुरस्कार करताना त्यामागे औषध कंपन्यांचा दबाव असल्याचा आरोपही केला आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, complications, arise during, treatment, diabetic patients