Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Kolhapur › ज्वालाग्राही पदार्थ अंगावर पडून बालकांसह चौघे जखमी

ज्वालाग्राही पदार्थ अंगावर पडून बालकांसह चौघे जखमी

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षामध्ये कॅनमधील ज्वालाग्राही पदार्थ अंगावर पडून शाळकरी मुलासह चौघे जण भाजून जखमी झाले. रंकाळा टॉवर चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्वप्निल सागर बिडकर (वय 12), सानिका सागर बिडकर (10), गीता चंद्रकांत मुळे (46), सरस्वती मोहन गजगेश्‍वर (48, रा. शिंगणापूर, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. शाळकरी मुलांना हातावर, पाठीवर भाजले आहे. तर महिलांनाही गंभीर इजा झाली आहे. जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

राजवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शिंगणापूर येथील सरस्वती गजगेश्‍वर मुलगा विजय गजगेश्‍वरला भेटण्यासाठी सकाळी किणी-घुणकीला गेल्या होत्या. मुलगा शेतात काम करीत असल्याने तणनाशक औषधासह ज्वालाग्राही पदार्थाची त्याला माहिती होती.

घराजवळील गवताचे तण नष्ट करण्यासाठी तिने मुलाकडून कॅनमधून ज्वालाग्रही पदार्थ आणले होते.भाजीपाल्याच्या पिशवीत कॅन ठेवून ती गंगावेस येथील रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबली. शिंगणापूरकडे जाणार्‍या (एम एच 09 - 9118) रिक्षातून ती घराकडे जात असताना रंकाळा टॉवर येथे कॅनचे झाकण उडाले. कॅनमधून पदार्थ अंगावर पडला. पायाला भाजल्याने महिलेने आरडाओरडा केला.

भीतीपोटी तिने गडबडीत पदार्थाचा कॅन रिक्षातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. शेजारी बसलेल्या स्वप्निल,  सानिका व अन्य प्रवाशांच्या अंगावर हा पदार्थ पडल्याने दोन महिला व बालके असे चौघे जखमी झाले. अनपेक्षित घटनेमुळे गोंधळलेल्या सर्जेराव शिपुगडे (रा. हणमंतवाडी, ता. करवीर) याने रिक्षा रस्त्यावर थांबविली. जखमींना रुग्णालयात हलविले.

पोलिस निरीक्षक अनिल गुजर, सहायक निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र भूतकर यांनी घटनास्थळासह रुग्णालयाकडे धाव घेत, जखमींची विचारपूस केली. जखमी बालकांसह महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भरचौकात घडलेल्या घटनेमुळे रंकाळा टॉवर परिसरात मोठी गर्दी झाली होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी चौकातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.