Sat, Mar 23, 2019 18:18होमपेज › Kolhapur › वीज चोरीचे गुन्हे दाखल करणारी स्वतंत्र पोलिस ठाणी अखेर बंद

वीज चोरीचे गुन्हे दाखल करणारी स्वतंत्र पोलिस ठाणी अखेर बंद

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:00PMकोल्हापूर : सुनील सकटे

विद्युत कायदा 2003 नुसार वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी स्वतंत्र अस्तित्वात आलेली राज्यातील पोलिस ठाणी बंद करण्यात आली आहे. याबाबत शासन आदेश नुकताच काढण्यात आला आहे. ही पोलिस ठाणी बंद केल्याने आता जिल्ह्यातील एक-दोन पोलिस ठाण्याची निवड करून तेथे संपूर्ण जिल्ह्यातील वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

विद्युत कायदा 2003 नुसार राज्यात सहा ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणी अस्तित्वात आली. पुणे, नाशिक, औरंगाबाद नागपूर, कल्याण, लातूर या ठिकाणी ही स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करण्यात आली. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील वीज चोरीचे गुन्हे पुणे येथील पोलिस ठाण्यात नोंदविण्यात येत असत. या कायद्यातील तरतुदीनुसार तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण केली आहेत. तर याच कायद्यानुसार वीज चोरीचे खटले निकालात काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाचीही तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच शासन आदेश काढून पोलिस ठाणी बंद केली आहेत. स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याऐवजी पोलिस ठाणीच बंद केल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. 

स्वतंत्र पोलिस ठाणी बंद करून ज्या जिल्ह्यातील वीज चोरीचा आढावा घेऊन एक-दोन पोलिस ठाण्यात संपूर्ण जिल्ह्यातील वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. वास्तविक पाहता वीज कायद्याने स्वतंत्र पोलिस ठाणी असताना बंद करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी आणि पोलिस कर्मचार्‍यांसह पोलिस ठाण्यांची अपुरी संख्या पाहता उपलब्ध पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. अशातच आता वीज चोरीचे गुन्हेही नियमित पोलिस ठाण्यात नोंद करून घेण्याची व्यवस्था केली जात आहे.