Thu, Feb 21, 2019 21:18होमपेज › Kolhapur › दोन्ही घाटगेंचे मनोमीलन या हवेतल्या गप्पा : संजय घाटगे

दोन्ही घाटगेंचे मनोमीलन या हवेतल्या गप्पा : संजय घाटगे

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कागलमध्ये दोन्ही घाटगे घराण्यांचे मनोमीलन या हवेतल्या गप्पा आहेत, असे कदापिही होणार नाही, ज्यांनी माझे वाटोळे केले त्यांच्याशी कसले आलेय मनोमीलन, अशा शब्दांत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी मनोमीलनाची शक्यता धुडकावून लावली. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाच्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही घाटगे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी वरील शब्दांत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. ते म्हणाले, दोन्ही घाटगे गटांची मने आधीच दुभंगली आहेत, आता त्याचे मीलन होणे कदापिही शक्य नाही. ज्यांनी आमचे वाटोळे केले आहे, त्यांच्याशी तर अजिबातच याबाबतीत चर्चा होणार नाही. आम्ही आमच्या ताकदीवर व जनतेच्या विश्‍वासाच्या बळावर विधानसभा लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गेल्या काही दिवसांपासून कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांना रिंगणात उतरण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. त्यासाठी समरजित घाटगे व संजय घाटगे हे दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी पालकमंत्र्यांसह माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही पुढाकार घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. शिवाय, विधान परिषदेवर संजय घाटगे यांना घेण्याबाबतच्याही चर्चा सुरू होत्या; पण आता खुद्द संजय घाटगे यांनी मनोमीलनाची शक्यता धुडकावून लावत लढण्याची घोषणा केल्याने कागलमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय घाटगे यांनी शिवसेनेकडूनच आपली उमेदवारी राहील, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असा तिरंगी सामना रंगणार आहे. 

Tags : Kolhapur, chat, between, two, ghatge,  air