Sat, Mar 23, 2019 01:56होमपेज › Kolhapur › समाजकंटकांना रोखण्याचे आव्हान

समाजकंटकांना रोखण्याचे आव्हान

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:25AMकोल्हापूर : दिलीप भिसे

किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षकांसह पन्‍नासवर अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्याने जिल्ह्यात पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांची नवी इनिंग सुरु झाली आहे. शांतता-सुव्यवस्थेसह समाजकंटकांना रोखण्याचे यंत्रणेसमोर मुख्य आव्हान आहे. सावकारशाही बोकाळली आहे. खंडणीखोरांचा धुमाकूळ माजला आहे. काळ्या धंद्यासह शस्त्रास्त्र तस्करांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी यंत्रणेला आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यातील संघटित टोळ्यांतील सत्तरांवर गुंडांवर मोक्‍का, शंभरांवर समाजकंटकांवर‘तडिपारी’चा बडगा उगारूनही गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढतो आहे. मुंबई, पुण्यासह आंतरराज्य मानवी तस्करी टोळ्यांचा वावर वाढला आहे. असहाय्येचा फायदा घेऊन कोवळ्या मुलींनाही शरीरविक्रयासाठी मजबूर केले जात आहे. स्किलगेमच्या नावाखाली तीन पानी जुगारी अड्ड्यांची संख्याही दोन, अडीचशेवर गेल्याचे दिसून येते. सावकारी टोळ्यांनी शहरासह ग्रामीण भागात दहशतीचे साम्राज्य दिसून येते.

चेनस्नॅचिंग, घरफोडी, जबरी चोरीसह ठकबाजीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. उचगाव येथील गजबजलेल्या कॉलनीत चोरट्यांनी दहा लाखांच्या ऐवजावर भरदिवसा डल्ला मारला तर इचलकरंजी येथील गारमेंट व्यावसायिक रामकृष्ण बाहेती याचे अपहरण करून सराईत टोळीने त्यांच्याकडून 1 कोटीची खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. राधानगरी तालुक्यातील नरतवडेतील एका शेतकर्‍याने सावकार शिक्षकाच्या दहशतीला कंटाळून गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.

गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असले तरी वरिष्ठांच्या आदेशाला हरताळ फासण्याचा उद्योेग झारीतील शुक्राचार्याकडून सुरू आहे. वरिष्ठांचा आदेश झुगारून अवैध व्यावसायिकांची पाठराखण केल्याचा ठपका ठेवून चंदगड येथील एका अधिकार्‍यासह चौघांवर खात्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारावा लागला. वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन ही बाब निश्‍चितच खटकणारी आहे.

सावकारशाहीला झटका

‘एलसीबी’चे तत्कालीन निरीक्षक दिनकर मोहिते वगळता एकाही अधिकार्‍याने प्रभावी कामगिरी केल्याचे दिसून येत नाही. लक्ष्मीपुरीचे तानाजी सावंत यांच्यावर ‘एलसीबी’ जबाबदारी आली आहे. पदभार स्वीकारताच चार दिवसांत पाच सावकारांना दणका दिला. काळे धंदेवाल्यांसह समाजकंटकांना रोखण्यासाठी किंबहुना नामचिन गुंडांवर जरब निर्माण करण्याची जबाबदारी वाढली 
आहे.

राजारामपुरी, राजवाडा, लक्ष्मीपुरी, करवीर, शहापूर, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड, पेठवडगाव, हातकणंगले, मुरगूड, कागल, भुदरगड या महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांत अधिकार्‍यांची नवी फौज दाखल झाल्याने काळे धंद्यासह रेकॉर्डवरील गुंडांना रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

संजय मोहितेपोलिस अधीक्षक, कोल्हापूर

काळ्या धंद्यांसह संघटित टोळ्या, गोरगरिबांचे आर्थिक शोषण करणार्‍या सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे सक्‍त आदेश जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात 20 सावकारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तक्रारदारांना केलेल्या आवाहनानुसार 55 सावकारांविरुद्ध पुराव्यासह तक्रारी आल्या आहेत. चारपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल झालेल्या टोळ्यांविरुद्ध मोक्‍का अंतर्गत कारवाईचा बडगा  उगारण्यात येत आहे. शंभर, सव्वाशेवर गुडांवर तडीपारीची कारवाई झाली आहे. शांतता सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांची गय केली जाणार नाही.