Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Kolhapur › केंद्रात गाजर, राज्यात लॉलीपॉप (video)

केंद्रात गाजर, राज्यात लॉलीपॉप (video)

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 1:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिवसेंदिवस इंधनाच्या वाढत्या दराच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्रातील मोदी सरकार जनतेला गाजर, तर राज्यात चंद्रकांत पाटील लॉलीपॉप दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले.

आंदोलकांनी बैलगाडीमध्ये बसून शिवाजी चौक येथून मोर्चाला प्रारंभ केला. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.  मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. राज्य शासन त्यावर विविध प्रकारचे कर आकारत आहे. यामुळे अप्रत्यक्षरीत्या महागाईत वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल 110 डॉलर्स होत्या.

तेव्हा पेट्रोल व डिझेलचे दर 60 ते 65 रुपये होते. आज कच्च्या तेलाच्या किमती 25 ते 28 डॉलर्सने उतरल्या आहेत. तर इंधनाचे दर 80 रुपये झाला आहे. अशाच पद्धतीने वाढ होत गेल्यास इंधनाचे दर 100 रुपयांच्या आसपास जातील. केंद्र व राज्य सरकारकडून दुपटीने दर आकारणी केली जात आहे.  राज्य शासनाने पेट्रोलवर 9 रुपये जादा अधिभार लावला आहे. तसेच 25 टक्के व्हॅट आकारत आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. मेट्रोसारखे प्रकल्प राज्यावर लादून जनतेवर कर लादला जात आहे. शासनाने हा वाढीव कर त्वरित रद्द करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, आंदोलकांनी हातात गाजर घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना कशा फसव्या आहेत, हे सांगितले. मोदी सरकार म्हणजे केवळ गाजर दाखवणारे सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत दिलेले कोणतेही आश्‍वासन पूर्ण केले नाही. केवळ अच्छे दिन येणार, असे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात  15 लाख रुपये जमा होणार, असे सांगितले; पण तसे काही झाले नाही.  त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहून केंद्र व राज्यातील सरकार हद्दपार करून टाकेल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.  

या आंदोलनात नगरसेवक नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजित चव्हाण, राहुल चव्हाण, रविकिरण इंगवले, दिगंबर फराकटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.