Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात गव्यांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात गव्यांच्या संख्येत वाढ

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:10PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील गव्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढती गव्यांची संख्या जैवविविधता संपन्‍नतेचे दर्शन घडवणारी आनंददायी घटना आहे. मात्र, मानवी वस्तीत घुसण्याचेही गव्याचे प्रमाण वाढत आहे, त्यात गव्यांचीही संख्या वाढल्याने या उपद्रवाची व्याप्तीही वाढण्याची भीती आहे. गव्यांची घुसखोरी रोखण्यासाठी वन विभागाने नियोजनाचा प्रस्ताव तयार केला आहे.

जिल्ह्याला विपूल वनसंपदा लाभली आहे. चंदगड ते शाहूवाडी असा सुमारे 650 कि.मी.चे क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. पश्‍चिम घाटात समावेश होत असलेल्या या वनात जैववैविधताही प्रचंड आहे. काही भागात ही संपदा वाढत चालली आहे. दाजीपूर अभयारण्यातही अशीच परिस्थिती आहे. यामुळे गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात गव्यांची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

गव्यांची वाढती संख्या आनंददायी असली तरी मानवी वस्तीत होणार्‍या घुसखोरीमुळे तशी ती चिंतेची आहे. अभयारण्याच्या क्षेत्रातच गव्यांचा मुक्‍काम राहील, या द‍ृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे शुक्‍ला यांनी सांगितले. अभयारण्यात सुमारे 154 पाणवठे आहेत, यापैकी कृत्रिमरीत्या तयार केलेल्या पाणवठ्यांची रचना बदलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राण्यांना सहजासहजी पाणी उपलब्ध होईल, अशी यापुढे या कृत्रिम पाणवठ्यांची रचना केली जाणार आहे. गव्यांच्या खाद्याच्या पैदासीचे प्रमाणही वाढवण्यावर भर दिला जात आहे.

गवे अभयारण्याबाहेर येणार नाहीत, याकरिता अभयारण्याच्या सीमेरेषेवर चर (बीपीटी) काढण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. अभयारण्याचे क्षेत्र मोठे आहे, त्यामुळे किमान 30-40 कि.मी. अंतर सलगपणे चर काढावी लागणार आहे. त्याद‍ृष्टीनेच प्रस्ताव तयार केला जात आहे. यामुळे गव्यांच्या मानवी वस्तीतील घुसखोरीला काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल, असा विश्‍वासही शुक्‍ला यांनी व्यक्‍त केला आहे.

2017 मध्ये 572 गव्यांची नोंद

दरवर्षी मे महिन्यात प्राणी गणना होते. मे 2016 साली झालेल्या गणनेच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली आहे. मे 2008 साली झालेल्या गणनेत दाजीपूर अभयारण्यात 350 गव्यांची नोंद झाली. मे 2016 मध्ये 407 तर मे 2017 मध्ये 572 गव्यांची नोंद झाली आहे. पाणवठ्यावर येणार्‍या गव्यांची ही संख्या आहे. प्रत्यक्ष अभयारण्यात किती गवे आहेत, हे स्पष्ट नसले तरी या गणनेवरून वाढीचा पॅटर्न स्पष्ट होत असल्याचे उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्‍ला यांनी सांगितले.