Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Kolhapur › भाजपकडून एकाला न्याय, दुसर्‍यावर अन्याय

भाजपकडून एकाला न्याय, दुसर्‍यावर अन्याय

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 10:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्रात आणि राज्यातील भाजप  सरकार द्वेषपूर्ण भूमिका घेऊन देशात जातीय तेढ निर्माण करत आहे. सरकारची वागणूक हुकूमशहा पद्धतीची आहे, एकाला न्याय आणि दुसर्‍यावर अन्याय, असा प्रकार या सरकारचा आहे. राज्या-राज्यांत विषारी जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. 

कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.  आंदोलनात आ. सतेज पाटील, महापौर सौ. स्वाती यवलुजे, मोहन जोशी, जयवंतराव आवळे,  दिनकरराव जाधव, प्रल्हाद चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी  पी. एन. पाटील म्हणाले, भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. पश्‍चिम बंगाल, बिहार, तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलींमध्ये भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता, हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री असलेल्या अश्‍विनी कुमार चौबे यांच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रात भीमा कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता भाजपशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, हे स्पष्ट झाले. असे असतानाही हे सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून हे उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

आंदोलनात माजी आ. संजीवनीदेवी गायकवाड, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अ‍ॅड. सुरेश कुराडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील, प्रदेश चिटणीस तौफिक मुल्लाणी, जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, गुलाबराव घोरपडे, अरुण डोंगळे, प्रकाश सातपुते, सुशील पाटील-कौलवकर, बाबुराव कांबळे, विद्याधर गुरबे, संजय पाटील, सत्यजित पाटील, विद्यार्थी संघटनेचे पार्थ मुंडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags : Kolhapur, behaviour, government, dictatorship