होमपेज › Kolhapur › पोलिस ठाणे आवारात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिस ठाणे आवारात भाजी विक्रेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

तक्रार देण्यास आलेल्या विलास जोगेश नायडू (वय 27, रा. टेंबलाई उड्डाणपूल परिसर) या भाजी विक्रेत्याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. 

विलास व त्याची आई लक्ष्मीबाई शाहूपुरी रेल्वे फाटक येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. गेले काही दिवस येथील इतर भाजी विक्रेत्यांशी त्यांचा वाद सुरू आहे. यातून नायडू याच्या विरोधात काही महिलांनी तक्रार अर्ज पोलिस ठाण्याकडे दिला होता.  पोलिसांनी  चौकशी करून तोडगा काढला होता.  रविवारी रात्री विलास नायडू तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. पोलिस ठाण्यात जाण्याआधी काही विक्रेत्यांशी चर्चा करत तो आवारातच थांबला होता. याच वेळी त्याने खिशातून विषारी औषधाची बाटली काढून त्यातील द्रव सेवन केले. यामुळे गोंधळ उडाला. विलासची आई लक्ष्मीबाई यांनी हा प्रकार  पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. 

फाळकूटदादांचा त्रास

शाहूपुरी भाजी मंडईत काही फाळकूटदादांचा त्रास विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याकडूनही येथे हप्ता मागण्याचा प्रकार होत असल्याचे विक्रेते सांगतात. संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांतून होत आहे.