होमपेज › Kolhapur › समितीच्या तीन उमेदवारांची घोषणा

समितीच्या तीन उमेदवारांची घोषणा

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगाव दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर या तीन मतदार संघांतील उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. या तिन्ही मतदारसंघांत जोरदार प्रचार यंत्रणा राबवून जनतेपर्यंत पोहचण्याचे काम केले जाईल, तेथील सर्व भाषिकांनीही  एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले. 

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून प्रकाश मरगाळे, बेळगाव ग्रामीणमधून मनोहर किणेकर, खानापूरमधून  विद्यमान आमदार अरविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 
अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने खा. पवार हे रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल पंचशिलमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, माजी खा. निवेदिता माने, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, राजू लाटकर, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, बेळगावसह सीमाभागात डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्यात येत आहे. उमेदवार निवडत असताना तालुका समितींकडून उमेदवारांची नावे देण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या होत्या. ही नावे मध्यवर्ती एकीकरण समितीकडे आली. त्यातून या तीन उमेदवारांची निवड झाली आहे.सीमा भागातील जनता गेली 65 वर्षं एकाच प्रश्‍नावर आंदोलन करत आहे. यासाठी तेथील जनतेचा मोठा त्याग आहे. या प्रश्‍नांसाठी काहींनी हौतात्म्य पत्करले आहे, अशा जनतेच्या मागे राहणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे मध्यवर्ती  समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहोत, तसेच त्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. उद्या निपाणी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने जात आहे. या ठिकाणी बोलण्याची संधी आहे. सीमा भागातील जनतेचे दुखणे काय आहे, ते स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांसह एकीकरण समितीचे आ. अरविंद पाटील, दीपक दळवी, निंगोजी हुंद्दार, एल. वाय. पाटील, राजू मरवे, दिनेश ओऊळकर, राजू ओऊळकर आदी उपस्थित होते.

Tags : Kolhapur, announcement, three, candidates, committee