होमपेज › Kolhapur › विमानाची बुधवारी चाचणी

विमानाची बुधवारी चाचणी

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:24AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई  या प्रवासी सेवेसाठी वापरण्यात येणार्‍या विमानाची बुधवारी (दि. 20) चाचणी घेण्यात येणार आहे. यावेळी विमानतळाचीही पाहणी करण्यात येणार आहे.  (दि.24) पासून ही विमानसेवा सुरू होणार असल्याने विमानतळावरील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यासर्व पार्श्‍वभूमीवर विमानतळ प्राधिकरण अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची गुरुवारी भेट घेतली.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा (दि.24) रोजी सुरू होणार आहे. एअर डेक्‍कन कंपनीच्या वतीने या मार्गावर 17 सीटर विमानाद्वारे ही सेवा देण्यात येणार आहे. या विमानाची बुधवारी चाचणी घेतली जाणार आहे. 

सध्या धावपट्टी दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात आहे. साईड पट्ट्यांची रंगरंगोटी, अंतर्गत पार्किंग, सरंक्षक भिंतीचेही काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरण अधिकार्‍यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी सुभेदार यांची भेट घेतली. यावेळी विमानतळ परिसरातील  टॉवर अडथळ्याबाबत महावितरणला पत्र देण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर पाठपुरावा करून त्रुटी दूर केल्या जातील असे सुभेदार यांनी सांगितले.

सांयकाळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी विमानतळाला भेट दिली. प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसह त्यांनी बैठक  घेतली. (दि.24) रोजी सुरू होणार्‍या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी नागरी विमान वाहतूक विभागाचे पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक व्ही.के.पुरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, विनातळ व्यवस्थापक पूजा मुल आदी उपस्थित होते.