Tue, May 21, 2019 04:57होमपेज › Kolhapur › सकल मराठा समाजातर्फे आज दसरा चौकात ठिय्या आंदोलन

सकल मराठा समाजातर्फे आज दसरा चौकात ठिय्या आंदोलन

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (दि. 24) दसरा चौकात ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता या आंदोलनाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती समाजातर्फे दिलीप देसाई, सचिन तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देसाई म्हणाले, सकल मराठा समाजाने 15 ऑक्टोबर 2016 रोजी कोल्हापुरात व्यापक मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्यानंतर राज्यात 58 मराठा मोर्चे निघाले ते अत्यंत शांततेच्या मार्गाने निघाले होते; पण या सरकारने मराठ्यांना आश्‍वासनाशिवाय काहीच दिले नाही. 

उलट आंदोलनात सहभागी झालेल्यांना धमकावणे, गुन्हे दाखल करणे, असे प्रकार सुरू करून संघटना फोडण्याचे, आंदोलन मोेडण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा बंद, रस्ता रोको, ठिय्या आंदोलन अशा प्रकारे वेगवेळ्या पद्धतीची आंदोलने केली जातील. या आंदोेलनातून जे काही नुकसान होईल, त्याला सरकार जबाबदार असेल.मंगळवारी जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे; पण सरकारकडून नेहमीच जिल्हा बंदी आदेश लागू केला जातो. जिल्हा बंदी आदेश असला, तरीही ठिय्या आंदोलन होणारच असल्याचे देसाई यांनी सांगितले. या आंदोलनात मराठा बांधवांसह भगिनींनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.

यावेळी अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, रुपेश पाटील, स्वप्निल पार्टे, संजय पोवार, इंद्रजित सावंत, कमलाकर जगदाळे, दिलीप सावंत, मनोज नरके, उमेश पोवार, दिलीप पाटील, संतोष चव्हाण, बबलू ठोंबरे, विनायक भांबुरे, गणी आजरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार्‍या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सोमवारी रात्री कारवाईसाठी प्रतिबंधात्मक नोटिसा दिल्या आहेत.