होमपेज › Kolhapur › वर्ल्ड आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा

वर्ल्ड आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:51AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी

बर्फाच्छादित प्रदेशातील रक्त गोठविणारा गारठा अशा प्रतिकूल वातावरणात अनोळखी गावातील रस्त्यावरून सायकल प्रवास, चढ-उताराच्या रस्त्यावरून धावण्याची स्पर्धा आणि थंडगार पाण्यात पोहणे अशा जगभरातील निवडक नामवंत स्पर्धकांशी मुकाबला करायला लावणार्‍या ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ स्पर्धेत क्रीडानगरी कोल्हापूरच्या तब्बल 15 मावळ्यांनी बाजी मारली. रविवारी युरोपातील ऑस्ट्रिया येथे झालेल्या या स्पर्धेचे खडतर अंतर निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत कोल्हापूरच्या मावळ्यांनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला.

चार कि. मी. जलतरण, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. धावणे अशी कस लावणारी ही स्पर्धा होती. बर्फाच्छादित प्रदेश, मायनस डिग्री तापमान अशा वातावरणात 18 ते 99 वयोगटासाठी ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केली जाते. यात जगभरातील सुमारे 50 देशातून तीन हजारांवर पुरुष व महिला स्पर्धक सहभागी झाले होते. चार कि.मी. पोहणे,
 42 कि.मी. धावणे आणि 180 कि.मी. सायकलिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. प्रत्येक स्पर्धकाने हे संपूर्ण अंतर 17 तासांत पूर्ण करणेआवश्यक होते. त्यातही पुन्हा पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, धावण्यासाठी सात तास आणि सायकलिंगसाठी 8 तास 30 मिनिटे अशी वेळ बंधनकारक होती. पोहणे व सायकलिंग प्रकाराची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 10 तास 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. ही स्पर्धा फत्ते करण्यासाठी कोल्हापूरच्या अ‍ॅडव्हेंचरपटूंनी गेली वर्षभर तयारी सुरू ठेवली होती. कोल्हापूर स्पोर्टस् क्लबच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचा कसून सराव करण्यात आला.

कोल्हापूरच्या टीमने प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत भरघोस यश मिळविले. स्पर्धा यशस्वीरीत्या पार करून ‘वर्ल्ड आयर्न मॅन’चा किताब पटकावणारे खेळाडू, कंसात त्यांनी नोंदविलेली वेळ (तास, मिनिटे, सेकंद) :  आदित्य शिंदे (10:52:45),  रौनक पाटील (14:04:20), आशिष तंबाके (14:40:08),  स्वप्निल माने (14:48:58), उदय पाटील (15:33:05), डॉ. प्रदीप पाटील (15:32:26), डॉ. संदेश बागडी (15:29:21), डॉ. विजय कुलकर्णी (15:31:43), विनोद चंदवाणी (15:32:26), महेश मेठे (15:58:45), विशाल कोथळे (15:58:45). याशिवाय चेतन चव्हाण (कोल्हापूर), सत्यवान नणावरे व बलराज पाटील (इचलकरंजी) यांचा समावेश आहे. टीमला ‘आयर्न मॅन’ वैभव बेळगावकर आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील, जलतरण तलावाचे प्रशिक्षक निळकंठ आखाडे, अश्‍विन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.