Wed, Jan 23, 2019 06:28होमपेज › Kolhapur › अतिक्रमणात घरकूल बांधलेल्या लाभार्थ्यांचा सर्व्हे होणार

अतिक्रमणात घरकूल बांधलेल्या लाभार्थ्यांचा सर्व्हे होणार

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:15PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गायरानात अतिक्रमण करून पूर्वी शासकीय घरकूल योजनेतून घरे बांधलेल्यांचा सर्व्हे करून तातडीने जि.प.कडे अहवाल पाठवा, अशा सूचना सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी दिल्या. घरकूल योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे आदेशही अधिकार्‍यांना त्यांनी दिले. 

जिल्हा परिषदेची समन्वय समितीची सभा बुधवारी आजरा येथे झाली. दर पंधरा दिवसांनी एका तालुक्यात समन्वय सभा घेण्याचा निर्णय सीईओ डॉ. खेमनार यांनी घेतला आहे. पंधरा दिवसांपूर्वी राधानगरीत सभा घेतल्यानंतर बुधवारी आजर्‍यात बैठक घेऊन सविस्तर आढावा घेण्यात आला. 

आजरा पंचायतीला भेट देऊन झीरो पेंडन्सीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पाणीस्वच्छता, घरकूल, नरेगा, ओपन स्पेस आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून धोरणात्मक निर्णयही घेण्यात आले. यासंदर्भात डॉ. कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले. घरकूल योजनेवरून जास्त चर्चा झाली. घरकूलसाठी पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 31 डिसेेंबरपर्यंत तयार करावयाची असल्याने त्याची तातडीने नोंंदणी करावी. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात बैठक लावावी, अशा सूचना गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

यापूर्वी झालेल्या घरकूल  योजनेतील बहुतांश घरे ही गायरानात अतिक्रमण केलेल्या जागेत बांधली असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना नियमित करण्यासंदर्भात शासनाकडे अहवाल पाठवावयाचा असल्याने तातडीने सर्व्हे करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जिल्ह्यातील 232 गावांची निवड झाली आहे. प्रकल्पासाठीची जागा सूचवण्यासह प्रकल्प खर्चाचा अहवाल तातडीने निवड झालेल्या ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे पाठवावा, अशा सूचना सीईओंनी दिल्या. कुशल कामावरील खर्च वाढवण्याच्या सूचना देतानाच कामाची गती वाढवण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती झाली असून त्यांना कॉम्प्युटर व स्टेशनरीसाठी पैसे तातडीने दिले जातील, असेही डॉ. खेमनार यांनी सांगितले.

ओपन स्पेस ताब्यात घ्या

एन.ए. केल्यानंतर ओपन स्पेस ताब्यात घेण्यास ग्रामपंचायती टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर आता ग्रामपंचायतींनी तातडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. गेल्या समन्वय सभेतच याप्रश्‍नी अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; पण तीनच ग्रामपंचायतींनी अहवाल पाठवला आहे. यापुढे दिरंगाई करणार्‍या ग्रामपंचायतींवर कारवाई सुरू केली जाणार आहे.