Wed, Nov 21, 2018 03:06



होमपेज › Kolhapur › अतिक्रमण नियमितीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिलेत का?

अतिक्रमण नियमितीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिलेत का?

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:51AM



कोल्हापूर :प्रतिनिधी 

कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरात आरक्षित जागेवर असलेली अतिक्रमणे राज्य शासनाने नियमित करू नयेत. तसेच संबंधित अतिक्रमणांवर कोल्हापूर महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आली. त्यानुसार मंत्र्यांना प्रतिवादी करून न्यायालयाने राज्य शासनाने संबंधित अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काही निर्देश दिले आहेत का? याचे स्पष्टीकरण करावे, असे आदेश सरकारी वकिलांना दिले. 25 एप्रिलला  सुनावणी होणार आहे. 

तावडे हॉटेल परिसरात महापालिकेच्या वतीने कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठी आरक्षण टाकले आहे. परंतु, त्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून बांधकामे केली आहेत. त्यासाठी उचगाव ग्रामपंचायतीने त्यांना बांधकाम परवानगी दिली आहे. परिणामी, संबंधित जागा कोल्हापूर महापालिकेची का उचगाव ग्रामपंचायतीची? असा वाद सुरू होता. अखेर उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाने संबंधित जागा महापालिकेच्या हद्दीत असल्याचे आदेश 22 फेब्रुवारीला दिले आहेत. परंतु, त्यानंतरही महापालिका प्रशासनाने तेथील अतिक्रमण हटविलेले नाही. 

दरम्यानच्या कालावधीत संबंधित बांधकामांबाबत मंत्रालयात नगरविकास विभागात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला महापालिका अधिकार्‍यांना बोलावण्यात आले होते. संबंधित अतिक्रमणे राज्य शासन नियमित करण्याच्या विचारात असल्याने तोपर्यंत कारवाई करू नये, असे तोंडी आदेश दिल्याची चर्चा होती. तेव्हापासून अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या वतीने थांबविण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भरत सोनवणे यांच्या वतीने अ‍ॅड. भूषण मंडलिक यांनी याचिका दाखल केली आहे. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, encroachment rules, Government instructions,