Thu, Jul 18, 2019 02:59होमपेज › Kolhapur › विद्यापीठाला पाच वर्षांत मिळाले फक्‍त 3 कोटी 90 लाख

विद्यापीठाला पाच वर्षांत मिळाले फक्‍त 3 कोटी 90 लाख

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 1:25AMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीने 50 कोटी रुपये विद्यापीठास देण्याची घोषणा केली. आता या घोषणेला पाच वर्षे होत आली. पन्‍नास कोटी रुपयांपैकी आतापर्यंत फक्‍त 3 कोटी 90 लाख रुपयेच विद्यापीठाच्या पदरात पडले आहेत. पन्‍नास कोटी रुपये मिळतील, या अपेक्षेने प्रशासनानेही विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले होते; पण कासवगतीने पैसे दिले जात असल्याने आता हे नियोजनच खोळंबले असल्याचे स्पष्ट आहे.

शिवाजी विद्यापीठाचा 2012-13 साली सुवर्ण महोत्सव साजरा झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करणार्‍या  विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात तत्कालीन उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी पन्‍नास कोटी रुपये देण्याची घोषणा केली.या घोषणेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात 2 कोटी 40 लाख रुपये विद्यापीठाला देण्यात आले. दुसर्‍या वर्षी म्हणजे 2013-14 साली पुन्हा 40 लाख रुपये  देण्यात आले. यानंतर राज्य सरकार बदलले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने उर्वरित निधीची रितसर मागणी केली. यानंतर 16-17 साली 75 लाख रुपये विद्यापीठाला मिळाले. पुन्हा 17-18 सालीही 35 लाख रुपये मिळाले. आतापर्यंत एकूण 3 कोटी 90 लाख रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. 

राज्य सरकारकडून घोषणा 50 कोटी रुपयांची करण्यात आली. आता प्रत्यक्षात पाच टक्के रक्‍कमही पाच वर्षांत विद्यापीठाला मिळालेली नाही. नियोजित निधी संथगतीने दिला जात असल्याने याबाबतच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. ग्रामीण परिसराचे नेतृत्व करणार्‍या शिवाजी विद्यापीठाला घोषणेप्रमाणे निधी मिळाला असता, तर किमान विद्यार्थ्यांसाठी कल्पक उपक्रम राबवण्यास हातभार लागला असता. त्यामुळे किमान आता तरी उर्वरित निधी वेगाने मिळावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

सातत्याने पाठपुरावा : कुलगुरू 

आम्ही सातत्याने हा निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा करत आहोत. आतापर्यंत एकूण निधीपैकी मिळालेला निधी अपुरा वाटावा, असा आहे. त्यामुळे यापुढील काळात  नियोजित निधी भरीवरीतीने मिळाला, तर अनेक शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे सोयीचे होईल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.