Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Kolhapur › अश्‍वारोहण स्पर्धेने इतिहासाला उजाळा

अश्‍वारोहण स्पर्धेने इतिहासाला उजाळा

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:32AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

शो जंपिंग टॉप स्कोर, शो जंपिंग नॉर्मल, शो जंपिंग चॅलेंज, पोल बेंडिंग, ट्रॉटिंग रेस, बॉल अ‍ॅण्ड बुकेट, जलेबी रेस, हॅक्स, हॅट रेस, टेंन्ट पेगिंग अशा विविध प्रकारांच्या चित्तथरारक स्पर्धात यशस्वी सहभाग नोंदवत घोड्यांसह त्यांच्या स्वारांनी उपस्थितांच्या टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळविली. कोल्हापुरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘द रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’ने लष्करी परंपरा लाभलेल्या इतिहासाला उजाळा मिळाल्याच्या प्रतिक्रिया क्रीडाप्रेमीतून व्यक्त करण्यात आल्या.

अश्‍वारोहन हा खेळ प्रकार नव्या पिढीला समजावा, या उद्देशाने कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशन तर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू पॅलेसच्या प्रांगणातील पोलो मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून सकाळ व सायंकाळच्या सत्रात ही स्पर्धा रंगली. देशभरातील 60 घोड्यांसह 70 महिला व पुरुष रायडर्सनी यात सहभाग नोंदविला. मुक्या प्राण्यासोबतच्या दोस्तीतून मानवासोबत निर्माण होणारा त्यांचा समन्वय थक्क करणारा ठरला. नागमोडी वळणे, उंच व लांब उडी, वार्‍याच्या वेगाने घोडदौड करत भाल्याने वस्तू उचलणे अशा एकसे बढकर एक थरारक प्रात्यक्षिकांनी हा हॉर्स शो अविस्मरणीय ठरला. शालेय विद्यार्थी, क्रीडाप्रेमी 
यांच्यासह देभरातून आणि परदेशातून आलेल्या पर्यटकांनीही या शोचा लाभ आवर्जून घेतला.

रविवारी सायंकाळी स्पर्धेचा बक्षीस समारंभ एअर मार्शल अजित भोसले, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते आणि  शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आ. मालोजीराजे, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शहाजीराजे, यशराजराजे, सौ. रूपाली नांगरे-पाटील, सौ. याज्ञसेनी महाराणी, सौ. संयोगिताराजे व सौ. मधुरिमाराजे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संंयोजन असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह घाटगे, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, सचिव अच्युत करांडे, सोनल करांडे, प्रशिक पाटेकर, शोहब शेख, रसिका जानवाडकर आदींनी केले आहे.

विजेतेपद पटकाविणारे खेळाडू...

कैस दलाल, चेतन मेंडीगिरी, शॉ, अमर खराडे, अनिरुद्ध मोहिरे, विधी सावंत, माधव लांबोरे, के. व्ही. सिंग, रितेश जाधव, निहारिका मणियार, वंश जोगाणी, शौनक दांडेकर, सिद्धराज शिंदे, रोहन करमरकर, अजिम शेख, शंकर मोरे, विनायक कर्नावर.

दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शन ठरले आकर्षण...

स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूरच्या घुडसवारीच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.  संस्थान काळापासूनची दुर्मीळ छायाचित्रे, माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.  छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह राजघराण्यातील व्यक्ती, सरदार-मानकरी यांच्याबरोबर रिसालदार, घोडेस्वार, इंग्रज अधिकारी अशी अनेक दुर्मीळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती.