Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Kolhapur › संध्यामठ व रंकाळा टॉवरचे गतवैभव जतन करणार : डॉ. योगेश जाधव 

संध्यामठ व रंकाळा टॉवरचे गतवैभव जतन करणार : डॉ. योगेश जाधव 

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरचे वैभव आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा टॉवर आणि संध्यामठचे गतवैभव जतन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी सौ. सरिता यादव उपस्थित होत्या. मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. योगेश जाधव यांनी ही बैठक बोलविली होती.

सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात शासनातर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा आढावा डॉ. योगेश जाधव यांनी घेतला. त्यानंतर प्रलंबित प्रश्‍नांबाबत त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांशी चर्चा केली. रंकाळा तलाव हे कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असून, संध्यामठ आणि रंकाळा टॉवरमुळे या वैभवात भर पडली आहे. 

परंतु, संध्यामठची सध्या दुरवस्था असून, त्याला गतवैभव प्राप्त करून दिले पाहिजे. त्याचबरोबर रंकाळा टॉवरचेही मजबुतीकरण करण्याची गरज आहे. या दोन वास्तू ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. 

त्यावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी, त्याबाबत काही योजना महापालिकेने तयार केली असल्याची माहिती दिली. त्यावर आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल आपण देऊ, असे सांगितले. या अहवालाला अंतिम रूप दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर हा प्रकल्प अहवाल येताच तो प्राधान्याने राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले.

रंकाळा तलाव प्रदूषणमुक्‍त करण्याबाबत अलीकडेच आपली पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा झाली असून, याबाबत लवकरच सर्वसंबंधितांची बैठक बोलवण्यात येणार असल्याचे डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनविषयक सविस्तर आराखडाही तयार करण्यास बैठकीत निश्‍चित करण्यात आले. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी आपल्याशी चर्चा केली असून, तेही आपला अहवाल देणार आहेत. कोल्हापूरला येणार्‍या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, हे पर्यटक आल्यानंतर लगेच परत जातात. तसे न होता ते दोन ते तीन दिवस येथे राहिले पाहिजेत व जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. यातून पुढील काळात हा एक चांगला रोजगार निर्माण करणारा व्यवसाय म्हणून आकारास येईल. पर्यटकांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांची माहिती आपोआप पोहोचेल, असे डॉ. जाधव म्हणाले. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी निधीची गरज असल्याचे सांगून कुणाल खेमणार म्हणाले की, विद्यार्थिनींना आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिनद्वारे पुरवत असून, ते नष्ट करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी मदतीची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य यासाठी मदतीची गरज लागणार आहे. विशेषतः शाळाखोल्यांसाठी सहाय्य मिळाले, तर विद्यार्थ्यांची सोय होऊ शकेल, असेही ते म्हणाले.