Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Kolhapur › पन्हाळगड-पावनखिंड मोहीम कोल्हापूरचे ऐतिहासिक वैशिष्ट्य

पन्हाळगड-पावनखिंड मोहीम कोल्हापूरचे ऐतिहासिक वैशिष्ट्य

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:58PMकोल्हापूर : सागर यादव 

शिवकाळात 12 व 13 जुलै 1660 या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ शेकडो मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. इतिहासातील या देदीप्यमान घटनेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विविध इतिहासप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने ‘पावनखिंड’ संग्राम दिनाचे आयोजन केले जाते. ही मोहीम कोल्हापूरचे एक ऐतिहासिक वैशिष्ट्य बनली आहे.  पन्हाळगड ते पावनखिंड अशी साहसी पदभ्रमंती मोहीम काढली जाते. यात राज्यासह देशभरातील साहसवीर-इतिहासप्रेमी प्रतिवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. संपूर्ण जुलै महिना या मोहिमेने व्यापलेला असतो. 

विजापूरचा सरदार सिद्धी जौहरने प्रचंड सैन्यासह पन्हाळगडाला वेढा दिला. यातून निसटून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी शिवछत्रपतींनी गनिमी काव्याची योजना आखली. भर पावसात रात्रीच्या अंधारात कालओघात दुर्लक्षित झालेल्या जुन्या मार्गाने विशाळगडाकडे जाण्यासाठी ते बाहेर पडले. आदिलशाही सैन्याला चकवा देण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांनी दोन पालख्या पन्हाळगडावरून बाहेर पडल्या. एका पालखीत स्वत: शिवराय तर दुसर्‍या पालखीत हुबेहूब त्यांच्यासारखी वेशभूषा केलेले शिवा काशीद होते. योजनेनुसार सर्व सुरू असताना शिवा काशीद यांची पालखी आदिलशाही सैनिकांना दिसली. त्यांनी शिवा काशीद यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मिळालेल्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत शिवछत्रपतींनी विशाळगडाकडे कूच केली.

इकडे शिवा काशीद यांचा बनाव लक्षात येताच आदिलशाही सैनिकांनी त्यांना क्रूरपणे मारले. यानंतर त्यांनी शिवछत्रपतींचा पाठलाग सुरू केला. पांढरेपाणी येथे त्यांना गाठले. पांढरेपाणी ते पावनखिंड (तत्कालीन घोडखिंड) या सुमारे 6 कि.मी. परिसरात अटीतटीची लढाई झाली. यात बांदल-मराठा सैन्यातील रायाजी बांदल, बाजी व फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे असे अनेक ज्ञात-अज्ञात मावळे कामी आले. स्वत: शिवछत्रपतींनीही विशाळगडच्या पायथ्याशी लढाई करत आपली सुटका करून घेतली. अशा या स्फूर्तीदायी इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रतिवर्षी या मोहिमेचे आयोजन केले जाते. 

असा आहे खडतर मार्ग...

पन्हाळगड ते विशाळगड या दोन किल्ल्यांमधील अंतर सुमारे 80 कि.मी. इतके आहे. ‘पावनखिंड’ संग्राम दिनानिमित्त आयोजित पन्हाळगड ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहिमेंतर्गत सुमारे 50 ते 55 कि.मी. अंतर पार करावे लागते. सह्याद्री पर्वतरांगेतील चढ-उताराच्या खडतर मार्गावरून अनेक ओढे-नाले, पाण्याचे प्रवाह, चिखल-काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग आणि जंगल पार करत अबालवृद्ध मोहीमवीर ही मोहीम फत्ते करतात. पन्हाळगड-मसाई पठार - कुंभारवाडी - खोतवाडी - मांडलाईवाडी, आंबेवाडी - करपेवाडी - पाटेवाडी - सुकामाचा धनगरवाडामार्गे पांढरेपाणी ते पावनखिंड असा मोहिमेचा मार्ग आहे. विविध संस्था-संघटनांतर्फे एक-दोन आणि तीन दिवस अशा कालावधीच्या मोहिमांचे आयोजन केले जाते. 

भावनिकतेचा गैरफायदाही

शिवछत्रपती आणि इतिहासाबद्दल लोक अत्यंत भावूक आहेत. या भावनिकतेचा गैरफायदा घेणार्‍यांची कमतरता या क्षेत्रात नाही. ‘मोहीम-ट्रेक’ अशी नावे देऊन एंजॉयमेंटच्या सहलीचे आयोजन काही जणांकडून केले जाते. सहभागी लोकांकडून 500 ते 1000 रुपयांपर्यंतचे अवास्तव शुल्कही आकारले जाते. इतकेच नव्हे तर  मोहिमेच्या अर्जापासून ते जेवण-राहण्यासाठीच्या प्रत्येक गोष्टीसाठी स्पॉन्सरशिपही मिळविली जाते. एखाद्या इव्हेंटप्रमाणे काहीजण ही मोहीम आयोजित करत असतात. अशा व्यावसायिक लोकांच्या भपकेबाज प्रसिद्धीमुळे निरपेक्षपणे इतिहासाचा जागर करणार्‍या संस्था-संघटनांचे कार्य दुर्लक्षित होत असल्याचे वास्तव आहे. 

असे आहे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहिमांचे नियोजन...

सह्याद्री प्रतिष्ठान : 12 व 13 जुलै 

हिल रायडर्स : 7 व 8 जुलै,  21 व 22 जुलै, 28 व 29 जुलै 

निसर्गवेध परिवार : 22 व 23 जुलै 

शिवशक्‍ती प्रतिष्ठान : 16 व 17 जुलै

आनंदराव पवार मर्दानी आखाडा : 14 व 15 जुलै 

मैत्रेय प्रतिष्ठान : 28 जुलै : एक दिवसीय रात्र मोहीम 

शिवराष्ट्र हायकर्स : 14 ते 16 जुलै 

हिंदवी परिवार : 13 ते 15 जुलै 

कोल्हापूर हायकर्स : 21 व 22 जुलै 

भरारी हायकर्स मुंबई : 27 ते 29 जुलै 

गिरीभ्रमण संघटना इचलकरंजी : 21 व 22 जुलै  

शिवसंस्कार प्रतिष्ठान : 28 व 29 जुलै