होमपेज › Kolhapur › महापालिका शाळा येणार ‘अ’ श्रेणीत!

महापालिका शाळा येणार ‘अ’ श्रेणीत!

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:29AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रवीण मस्के

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा सिद्धीमध्ये महापालिकेच्या 9 शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली असून, उर्वरित सर्व शाळांना मार्च 2018 अखेर प्रथम श्रेणीत आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

महापालिकेच्या वतीने शहरात 59 शाळा चालविल्या जात असून, यात सुमारे 9,825 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असे असले तरी महापालिकेच्या 14 शाळांमधील पटसंख्या ही 200 च्या वर आहे. जरगनगर शाळा 1,400 पटाच्या पुढे आहे. महापालिका शाळांची श्रेणी वाढविण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शाळांची 125 गुणांची परीक्षा घेण्यात येते. 

पटावरील संख्या अधिकतम ठेवणे, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, स्वच्छता, विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार याबरोबरच कविता व पाच मिनिटांची नाटिका सादर करणे, वेळ अचूक सांगणे, चित्र काढणे आदी मुद्द्यांवर शाळांची पडताळणी करून गुणांकन केले जाते. यात 80 पेक्षा अधिक गुण मिळविण्यार्‍या शाळांना ‘अ’ श्रेणी दिली जाते. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यानुसार वाचन, लेखन, संख्याज्ञान यानुसार विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले आहेत.