Sun, Jul 05, 2020 02:13होमपेज › Kolhapur › दूध संघांवरील कारवाई मागे घेऊ

दूध संघांवरील कारवाई मागे घेऊ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारने गायीच्या दूध खरेदी दरात कपात करणार्‍या संघांवर जो कारवाई करण्याचा आदेश दिला होता, हा आदेश दोन दिवसांत मागे घेण्याची ग्वाही दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिल्याचे गोकुळ चेअरमन विश्‍वास पाटील यांनी सांगितले. शासनाचा दरवाढीचा निर्णय चुकीचा होता, हे त्यामुळे सिद्ध झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

पाटील म्हणाले, औरंगाबाद येथे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील 27 सहकारी दूध संघांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दूध संघांना काढण्यात आलेल्या नोटिसीबाबत चर्चा झाली. संघांना ज्या नोटीस काढण्यात आल्या आहेत त्या मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले आहे, असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ करणे हे संघांना परवडणार नसल्याचे आता शासनालाही मान्य झाले आहे. त्यामुळेच ते कारवाईचा आदेश मागे घेत आहेत. मात्र, विरोधकांनी दूध दरवाढीचा विषय जाणीवपूर्वक लावून धरला असल्याची टीका त्यांनी केली.

भाजप महामंत्र्यांसमोर सरकारची खरडपट्टी

गोकुळ दूध संघात झालेल्या पत्रकार परिषदेत संघाच्या अनेक संचालकांनी सरकारवर टीका केली.इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, शासनाला सुडबुद्धी सुचली आणि त्यांनी शेतकरी संप मिटवण्यासाठी दूध दरवाढीचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. दूध व्यवसायाची परिपूर्ण माहिती न घेता दर वाढवल्याने राज्यातील संघांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

या दरवाढीने राज्यातील एकही संघ आता सरकारच्या बाजूने नसल्याचे नरके यांनी सांगितले. तर संघाचे चेअरमन पाटील म्हणाले, शासनाने दूध दरवाढ केल्याने संघ अडचणीत आले आहेत. शासनाचा निर्णय चुकीचा होता हे पटवून दिल्यानेच या निर्णयात बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे संघटन मंत्री व गोकुळचे संचालक बाबा देसाई यांच्यासमोरच सरकारवर टीका झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.