Sun, Apr 21, 2019 14:29होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणप्रश्‍नी २१ रोजी जनसुनावणी

मराठा आरक्षणप्रश्‍नी २१ रोजी जनसुनावणी

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्‍नी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने कोल्हापुरात दि. 21 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे जनसुनावणी घेतली जाणार आहे. 

मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण जाणून घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने विभागवार जनसुनावणी घेण्यात येत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत व विदर्भात नागपूर आणि अमरावतीसह अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सुनावणी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सुनावणी होत आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील ज्या व्यक्‍ती, संस्था व संघटना यांना मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासंबंधी आयोगासमोर निवेदन सादर करावयाचे आहे किंवा आपले म्हणणे मांडावयाचे असल्यास अशा व्यक्‍ती, संस्था व संघटना  यांनी लेखी पुराव्यासह व ऐतिहासिक दस्तऐवज तसेच विविध माहितीसह दि. 21 मे रोजी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील सभागृहात जनसुनावणीवेळी आयोगासमोर लेखी म्हणणे सादर करावे, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. या सुनावणीसाठी आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्यासह आयोगाचे एकूण 13 सदस्य, संशोधन अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी सर्व सुनावण्या पूर्ण होतील : न्या. गायकवाड

मराठा आरक्षणप्रश्‍नी प्रत्येक जिल्ह्यात सुनावणी घेतली जात आहे. पावसाळ्यापूर्वी या सर्व सुनावण्या पूर्ण होतील, असा विश्‍वास महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी व्यक्‍त केला. सुनावणीदरम्यान लेखी निवेदन सादर केल्याने संबंधितांना आरक्षण का द्यावे, अथवा का देऊ नये, याबाबतचे पुरावे सादर करता येतील, त्याचे रेकॉर्ड राहील, त्यावर विश्‍लेषण करता येईल. त्याचा याबाबतचा अहवाल तयार करताना मोठी मदत होईल, असेही न्या. गायकवाड यांनी सांगितले.