Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Kolhapur › समाजसेवेसाठी पैशांपेक्षा चांगल्या विचारांची गरज

समाजसेवेसाठी पैशांपेक्षा चांगल्या विचारांची गरज

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:32PMकोल्हापूर : प्रतिनिधी

समाजसेवेसाठी पैशांची गरज नसून, चांगल्या विचारांची गरज आहे. आपल्यामधील चांगले विचार दाबून ठेवू नका, त्यांचा समाज विकासासाठी वापर करा, असे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी केले.

कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे (केआयटी) आयोजित ‘अभिग्यान’ व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. 94.3 टोमॅटो एफ.एम. हे माध्यम प्रायोजक होते. केआयटीचे विशस्त दीपक चौगुले, सुनील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 4) उद्घाटन झाले. मिश्रा म्हणाल्या, संवेदना हरवल्याने माणूस समाजापासून लांब चालला आहे. ग्रामीण भागातील गरीब, श्रीमंत हा भेद दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाने पुढाकार घेऊन कामावर लक्ष केंद्रित केल्यास वाईट गोष्टी घडणार नाहीत. 

तेलंगणा येथील आयपीएस अधिकारी महेश भागवत म्हणाले, देशात महिलांवरील अत्याचार, मानव तस्करी यासारख्या गोष्टी सुरू आहेत. इच्छाशक्तीने सर्वजण एकत्र आल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत. निर्भया प्रकरणानंतर देशात नवीन कायदा लागू झाला असून, त्याचे परिणाम दिसून येत आहेत. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी डोके शांत, पाय जमिनीवर ठेवून समाजासाठी योगदान द्यावे. 

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोेरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सावंत यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाल्यावर माणसे बेकार होतील, असा गैरसमज पसरत आहे. पुढील पाच वर्षांत थ्री-डी मेमरी, नॅनो सेन्सर, लार्ज डेटा हाऊस यासारख्या गोष्टींमुळे नवीन जग निर्माण होणार आहे. व्यापार, उद्योग, व्यवसायात अफाट संधी तयार होतील. देशाच्या विकासासाठी सर्जनशील माणूस घडेल, असे शिक्षण देणे गरजेचे आहे. 

ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, आधुनिक युगात विज्ञानाचे योगदान महत्त्वाचे आहे. युरोपमध्ये झीरो पोल्युशन टेक्नॉलॉजीचा वापर सुरू आहे. औद्योगिक विकासाचे फायदे झाले त्याचबरोबर पर्यावरण र्‍हास झाला. बांधकाम व खाणकामामुळे ग्रामीण जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रावर पर्यावरणासंबंधी निर्बंधांची गरज आहे. प्रत्येकाने वैयक्तिकस्तरावर पर्यावरणसंवर्धनाची कामे केली पाहिजेत. प्रसिद्ध कवी संदीप खरे म्हणाले, कविता हा स्वत:शी केलेला संवाद असून, व्यक्त होण्याचे माध्यम आहे. तरुणांनी साहित्य वाचन वाढविले पाहिजे.