Tue, Jul 23, 2019 10:55होमपेज › Kolhapur › इचलकरंजी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणारच

इचलकरंजी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण होणारच

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 05 2018 11:06PMकबनूर : वार्ताहर

नियोजित हातकणंगले-इचलकरंजी या नवीन 8 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या सर्व्हेमुळे शेती व घरे जाणार या भीतीने शेतकरी व नागरिकांची झोप उडाली आहे. सर्व्हेला होत असलेला वाढता विरोध पाहता, रेल्वे प्रशासनाने सर्व्हे पूर्ण करण्यासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे  शेतकरी व रेल्वे प्रशासन असा संघर्ष अटळ बनला आहे. 

रेल्वे प्रशासनाने पोलिस यंत्रणेकडे सर्व्हेसाठी संरक्षण मागितल्यामुळे रेल्वेमार्गावरील शेतकर्‍यांचा विरोध का, याबाबत त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानंतर रेल्वेची मागणी करणार्‍यांचीही बैठक बोलवावी. या दोघांची मते वरिष्ठ अधिकार्‍यांना व रेल्वे प्रशासनाला कळवणार असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे हा अहवाल गेल्यानंतर रेल्वेचा सर्व्हे थांबणार की पुन्हा पोलिस संरक्षणात सुरूच राहणार, हे समजणार आहे. 

रेल्वेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असले, तरी रेल्वे मंजूर झाल्यानंतर इचलकरंजीतील काहींच्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण, इचलकरंजीला रेल्वे यावी यासाठी बर्‍याच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. रेल्वेसाठी तत्कालीन खासदार श्रीमती निवेदिता माने, कै. सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, विद्यमान खासदार राजू शेट्टी, आ. सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, आ. हसन मुश्रीफ यांनी खास पत्रे दिली होती. त्यानंतर कराड-निपाणी-बेळगाव व्हाया इचलकरंजी अशा नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी इचलकरंजीत आनंदोत्सव साजरा केला. 

या रेल्वेमार्गाचा कबनूर येथे तीन वेळा सर्व्हे झाला; मात्र या मार्गावरील कुंभोज ते कबनूरपर्यंतच्या 13 गावांतील शेतकर्‍यांनी विरोध केला. 13 गावांच्या ग्रामसभांमध्ये विरोधाचे ठरावही झाले. अनेक सहकारी संस्थांनी रेल्वेला विरोध केला. त्यामुळे काही काळ हे प्रकरण शमले होते; मात्र पुन्हा नव्याने हातकणंगले-इचलकरंजी या मार्गास अधिवेशनात मंजुरी दिल्याने रेल्वे प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

ज्या भागात रेल्वे आणायची त्या भागातील खासदारांची त्यास मंजुरी लागते; मात्र खा. शेट्टी यांनी या रेल्वेमार्गास ते गैरहजर असल्याने मंजुरी दिली नव्हती. दरम्यान, खा. धनंजय महाडिक यांनी या नव्या 8 किलोमीटर रेल्वेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे समजते. त्यामुळे खा. शेट्टी रेल्वेच्या विरोधात व बाजूने काहीच बोलायला तयार नाहीत. आ. हाळवणकर यांनीही याप्रश्‍नी अवाक्षर काढलेले नाही. शेतकरीवर्ग मात्र हवालदिल झाला असून, रेल्वे येऊ नये, यासाठी सर्वत्र धावाधाव करताना दिसत आहे. मात्र, त्याला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.