Thu, Jul 18, 2019 02:42होमपेज › Kolhapur › ...अन् शिक्षणमंत्री तावडे चर्चेसाठी बिंदू चौकात आलेच नाहीत!

...अन् शिक्षणमंत्री तावडे चर्चेसाठी बिंदू चौकात आलेच नाहीत!

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाळा बंदच्या विषयावर बिंदू चौकात चर्चेसाठी येण्याची तयारी दर्शवूनही शिक्षण मंत्री विनोद तावडे न आल्याबद्दल शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने गाणी गाऊन व घोषणाबाजी करून मंत्री तावडे यांचा निषेध केला. 

शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात  शिक्षण वाचवा कृती समितीच्यावतीने जनआंदोलन हाती घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आंदोलक लोकांची दिशाभूल करत आहेत, लोकांना चुकीची माहिती देत आहेत, असे सांगून या विषयावर आंदोलकांशी चर्चा करण्यास बिंदू चौकात येण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी कृती समितीने तयारी दर्शवली होती. तसेच चर्चेस येण्यासंबंधी मंत्री तावडे यांना दोनवेळा ई-मेल व स्मरणपत्र पाठविण्यात आले होते. तसेच चर्चेसाठी आम्हीच वेळ देतो, तुम्ही 30 मे 2018 रोजी सायंकाळी 5.30 वा. चर्चेसाठी बिंदू चौकात यावे, असेही त्यांना कळविण्यात आले होते. 

त्यानुसार कृती समितीचे कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून बिंदू चौकात पुष्पहार, चहा, वर्की येऊन त्यांची वाट पाहत बसले होते. तास ते दीड तास होऊनसुद्धा मंत्री तावडे बिंदू चौकात चर्चेला आले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मंत्री तावडे यांचा फोटो आणून तो खुर्चीवर ठेवला. त्या फोटो पुढे कार्यकर्त्यांनी शैक्षणिक धोरणावर चर्चा केली व मंत्री तावडे यांना आव्हान दिले की अशी बनावट आव्हाने देऊ नका, सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करा,  बनावट व थातूर मातूर सहन करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.  यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे  यांचे भाषण झाले. आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, सुधाकर सावंत, गिरीष फोंडे, गणी आजरेकर, सुभाष देसाई आदी सहभागी झाले होते.