Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Kolhapur › काँग्रेसकडे सहा महिन्यांसाठी महापौरपद

काँग्रेसकडे सहा महिन्यांसाठी महापौरपद

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पुढील अडीच वर्षांसाठीच्या महापौरपदावर सर्वसाधारण महिला (ओपन) प्रवर्ग असे आरक्षण आहे. सद्या कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेतील फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसकडे पहिल्या सहा महिन्यांसाठी महापौरपद राहणार आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ही माहिती दिली. तसेच राष्ट्रवादीच्या दुप्पट नगरसेवक असल्याने काँग्रेसला जादा पद मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नगरसेवक सहलीवर जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे आमदार पाटील यांच्याकडून सोमवारी सकाळी इच्छुकांपैकी एका उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. त्या उमेदवारासह त्यांच्या उमेदवारी अर्जाला सूचक व अनुमोदक असतील त्या नगरसेवकांना कोल्हापुरात आणले जाईल, असे स्पष्ट केले. कुणाला काळजी असेल तर उमेदवारी अर्ज भरतानाचे लाईव्ह टेलिकास्ट करू, असेही सांगितले. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे. साहजिकच त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादीला थोडा त्याग करावा लागेल, असे स्पष्ट केले.   

काँग्रेस नेहमीच झोपलेली...

आमदार मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्यासमोरच काँग्रेसला टोला लगावला. गोवा, मणिपूर व आसाम या ठिकाणी संधी असतानाही काँग्रेसने काहीही केले नाही. अशाप्रकारे राजकारणात काँग्रेस नेहमी झोपलेली असते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस जागी झाली. सहलीवर पाठविलेल्या आमदारांचे मोबाईल काढून घेतल्याने फोडाफोडीचे भाजपचे मनसुबे उधळले. नेत्यांच्या सतर्कतेमुळेच भाजपला सत्तेपासून दूर रोखणे आणि काँग्रेसला आपले आमदार पक्षासोबत ठेवणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.