Thu, Apr 25, 2019 03:53होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड नगराध्यक्षांविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

कुरूंदवाड नगराध्यक्षांविरुद्धची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:30PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

राज्य शासनाने लोकनियुक्‍त नगराध्यक्षांना दिलेल्या दोन मतांच्या अधिकाराच्या  परिपत्रकाची कायद्यात तरतूद केल्याने येथे उपनगराध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी दोन मतांचा बजावलेला हक्‍क अधिकृत असून उपनगराध्यक्ष निवडही कायदेशीर असल्याने त्याविरोधात कोणताही अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, श्रीमती साधना जाधव यांनी नकार दिला. 

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नगरसेविका सुशीला भबिरे यांनी नगराध्यक्ष पाटील यांनी परिपत्रकाचा आधार घेत वापरलेला दोन मतांचा हक्‍क बेकायदेशीर ठरवावा व उपनगराध्यक्ष निवड रद्द ठरवावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने सौ.भबिरे यांना शासनाने निर्माण केलेल्या कायद्याला आव्हान करणारी याचिका दाखल करावी, असे सूचित केले आहे.

कुरूंदवाड पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक फुटून भाजपच्या गटात गेल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडे 9 सदस्य तर भाजप स्वाभिमानी आघाडीकडे 9 असे समान बलाबल झाले होते. त्यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी दोन मताचा हक्‍क बजावला होता. काँग्रेसचे अक्षय आलासे व भाजप-स्वाभिमानीच्या सुशीला भबिरे यांच्यात उपनगराध्यक्ष पदासाठी  लढत झाली होती. या निवडणुकीत दोन्ही बाजूला समान मते झाल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी दुसर्‍या मताच्या अधिकाराचा हक्‍क बजावला होता. या निवडीत सौ.भबिरे यांचा पराभव झाला होता. 

न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्‍तिवाद पाहून नगराध्यक्षांच्या दोन मतांबाबतच्या परिपत्रकाचे कायद्यात रूपांतर झाल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी दोन मतांचा हक्‍क बजावला आहे. यामुळे ही उपनगराध्यक्ष निवड कायदेशीर असून नगरसेविका सौ.भबिरे यांनी परिपत्रकाला आव्हान करणारी याचिका दाखल केली होती. त्यांनी कायद्याला आव्हान करणारी याचिका दाखल करावी, असे सूचित केले आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Kuruntwad mayor, Bombay High Court, petition, rejected,