Thu, Nov 14, 2019 06:32होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ मल्टिस्टेट : संचालकांचे शिक्कामोर्तब

‘गोकुळ’ मल्टिस्टेट : संचालकांचे शिक्कामोर्तब

Published On: Jul 12 2019 1:49AM | Last Updated: Jul 12 2019 1:49AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्यावर ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. संघाचे नेते महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांच्यासमोर उपस्थित संचालकांनी आपला मल्टिस्टेटला पाठिंबा असेल, तर आमचा विरोध असण्याचा प्रश्‍नच नाही, असे म्हणत ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटला नेत्यांपाठोपाठ पाठिंबा दिला. ‘गोकुळ’ मल्टिस्टेट होणार की नाही, या चर्चेला संचालकांनी गुरुवारच्या बैठकीत पूर्णविराम दिला.

‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याच्या बाजूने असल्याची ठोस ग्वाही संचालक मंडळाने दिल्याने ‘गोकुळ’च्या पातळीवर कोणताही विरोध नाही, मल्टिस्टेटचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांना बैठकीचे निमंत्रण न देता निर्णय प्रक्रियेतून वगळण्यात आले. तर माजी चेअरमन विश्‍वास नारायण पाटील व रणजित पाटील, संचालक अनिल यादव बैठकीला अनुपस्थित होते.

‘गोकुळ’ मल्टिस्टेटवरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. मल्टिस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करण्याचा डाव आहे. मल्टिस्टेट करून गोकुळ दूध संघ पुन्हा तोट्यात ढकलणे. ‘गोकुळ’वर एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मल्टिस्टेट होऊ न देण्याचा दिलेला शब्द खरा करावा, असे आवाहन केले होते. तर ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी मल्टिस्टेटबाबत लोकभावना तीवˆ असल्याचे लक्षात घेऊन, प्रसंगी मल्टिस्टेटला विरोध करण्याचा इरादा यापूर्वीच जाहीर केला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची आढावा बैठक महाडिक व पी.एन. यांनी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात सायंकाळी चार वाजता घेतली.

बैठकीसाठी साडेतीन वाजल्यापासून संचालक कार्यालयात दाखल झाले. चार वाजून पाच मिनिटांनी महादेवराव महाडिक कार्यालयात आले. तर सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पी. एन. पाटील आले. वीस मिनिटे या दोघांनी संचालकांशी चर्चा केली. मुख्य मुद्द्याला हात घालत नेत्यांनी मल्टिस्टेटबाबत कोणाला आक्षेप असल्यास सांगावे, असे स्पष्ट केले. आपण जो निर्णय घ्याल, तो आम्हा उपस्थित सर्व संचालकांना मान्य आहे. आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे संचालकांनी एकमुखी सांगितले. यानंतर दैनंदिन दूध संकलन व संघाच्या अडचणींबाबत चर्चा होऊन पंधरा ते वीस मिनिटांत बैठक संपली.

मंगळवारी संचालकांची बैठक

संचालक मंडळाची अधिकृत बैठक मंगळवारी (दि. 16) होत आहे. ही बैठक चेअरमन रवींद्र आपटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला सर्व संचालक उपस्थित असतील. संचालक मंडळाच्या या अधिकृत बैठकीला संघातर्फे अरुणकुमार डोंगळे यांना निरोप दिला जाईल. या बैठकीत  संचालक मंडळातील नाराज घटक मल्टिस्टेटबाबत उघड भूमिका घेण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमताने संचालकांनी मल्टिस्टेटच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतल्याने काहींच्या विरोधाला अर्थ राहणार नाही.

डोंगळे एकाकी, तर विरोधकांचा पाठिंबा

मल्टिस्टेटसाठी बोलावलेल्या या बैठकीला अरुणकुमार डोंगळे यांना डावलून एकटे पाडले. मल्टिस्टेटवरून डोंगळे यांनी लोकभावनेचा विचार करावा, प्रसंगी आपण राजीनामा देण्याचे वक्तव्य केले होते. परिणामी, नेत्यांनी डोंगळे यांना आढावा बैठकीत येण्यापासून रोखले. अंबरिश घाटगे हे विरोधी आघाडीतून निवडून आले होते. त्यांनी मल्टिस्टेटच्या मुद्द्यावर वाच्यता केली नाही. याचा अर्थ ते सत्ताधारी आघाडीसोबत असल्याचे बोलले जाते.

चौघे अनुपस्थित

महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती, असे मला समजले. या बैठकीला आपणास निमंत्रण नव्हते, त्यामुळे याबाबत कोणेतही भाष्य करू इच्छित नाही. नो कॉमेंटस् अशी प्रतिक्रिया अरुणकुमार डोंगळे यांनी बैठकीबाबत दिली. माजी चेअरमन विश्‍वास नारायण पाटील कोल्हापुरात असूनही बैठकीला आले नाहीत, ते नॉट रिचेबल होते. खासगी कामानिमित्त ते येणार नसल्याचे ‘गोकुळ’च्या सूत्रांनी सांगितले. रणजित पाटील व अनिल यादव हे दोघे पंढरपूरला गेल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत.

नेत्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे : महाडिक

सहकार संस्थेत व्यक्तिगत मताला काही अर्थ नसतो. सर्व संचालक मंडळ मिळून निर्णय घेत असते. एकाने विरोध केला म्हणून निर्णयात बदल होत नसतो. बहुसंख्य संचालकच निर्णय घेतील तो मान्य होत असतो. त्यास नेते मंडळी मार्गदर्शन करीत असतात, अशा शब्दांत महादेवराव महाडिक यांनी डोंगळे यांच्या अनुपस्थितीवर भाष्य केले.

मल्टिस्टेट करण्याचा निर्णय यापूर्वी सर्वसाधारण सभेत झाला आहे.  मल्टिस्टेटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली नव्हती. संघाच्या अडचणी व संचालकांची मते जाणून घेण्याबाबत अशा प्रकारची दर महिन्याला आढावा बैठक घेतली जाते.
    -  माजी आमदार पी. एन. पाटील.