Sun, May 26, 2019 00:48होमपेज › Kolhapur › हरायचं नाय... लढायचं हाय...

हरायचं नाय... लढायचं हाय...

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘हरायचं नाय..लढायचं हाय..थकायचं नाय..’ अशी घोषणा देत आशा कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. यावेळी दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. जिल्हा परिषदेसमोर कर्मचार्‍यांनी ठिय्या मारल्याने हा रस्ता सुमारे एक ते दीड तास वाहतुकीसाठी बंद राहिला. 

आरोग्य अभियान कायम करा, अशांना सेवेत कायम करा, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज ‘सिटू’ संलग्न असलेल्या कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी सकाळपासून कार्यकर्त्या रेल्वे स्टेशनवर जमत होत्या. येथून साडेबारा वाजण्याच्या सुमारास येथून मोर्चास सुरुवात झाली. स्टेशन रोड, बसंत बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आशा कर्मचार्‍यांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. मोर्चात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे मोर्चाच्या मार्गावील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आशा कर्मचारी व गटप्रवर्तक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आहेत. ग्रामीण व शहरी भागात या कर्मचारी नागरिकांचे आरोेेेग्य जपण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. शासकीय रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण 99 टक्यांवर गेले आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांमध्ये त्यांचा सहभाग असतो. असे असताना त्यांना मिळणारा मोबदला मात्र अतिशय कमी आहे आणि तो देखील वेळेवर दिला जात नाही. कधी कधी चार महिने प्रतीक्षा करावी लागते. याशिवाय आशा कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व त्यांना किमान 18 हजार रुपये वेतन द्यावे, भविष्य निर्वाह निधी लागू करावा व इतर सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात, आदी मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

शिष्टमंडळात युनियनच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील, माया पाटील, ज्योती पाटील, विमल अतिग्रे,  शुभांगी चेचर, अर्चना कुलकर्णी,  मंदाकिनी कोडक, मनीषा पाटील,  सुरेखा तिसंगीकर, सारिका पाटील, उज्वला जडे, सुलोचना माने, संगीता पाटील, राधिका घाटगे, आरती भोसले, शर्मिला काशीद,  प्रतिभा इंदुलकर, दीपा बुरूड, अनिता अनुसे,  सारिका कांबळे, डॉ. सुभाष जाधव, सुभाष निकम आदींचा समावेश होता.