Wed, Nov 14, 2018 10:08होमपेज › Kolhapur › पर्यायी पूल 100 मीटरच्या बाहेरच

पर्यायी पूल 100 मीटरच्या बाहेरच

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलाचा मुख्य अडथळा दूर होण्याची शक्यता असतानाच आता राज्य शासनानेही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी देण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 1) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत परवानगीबाबतचा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला गुरुवारी (दि. 31) अहवाल सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने बुधवारी ई-मेलद्वारे अहवाल सादर केला. तर लेखी अहवाल गुरुवारी देण्यात येणार आहे. ‘पुरातत्त्व’च्या जागेपासून पर्यायी पुलाचे अंतर 100 मीटरपेक्षा अधिक असल्याचे दोन दिवस सुरू असलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले असून, बांधकामासाठी नाहरकत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे.

पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे पर्यायी पुलाचे बांधकाम ठप्प झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ‘नॅशनल हेरिटेज कमिटी’कडे यापूर्वी नाकारलेल्या परवानगीचा फेरविचार करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विनंती करण्यात आली होती. तसे पत्र कमिटीला पाठवण्यात आले होते. याबाबत निर्णय न घेतल्यास परवानगी देण्यात आली आहे, असे समजून काम सुरू करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रात स्पष्ट केले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी कोल्हापुरात येऊन प्रत्यक्ष पुरातत्त्वच्या अखत्यारीत असलेल्या परिसराची दोन दिवस पाहणी केली.

पुरातत्त्व विभागाच्या वतीने उत्खनन केलेल्या परिसराची मोजणी करण्यात आली. त्याच्या सीमारेषा निश्‍चित करण्यात आल्या. यानंतर या जागेपासून पर्यायी पुलाचे अंतर याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालासह पर्यायी पुलासाठी ना-हरकत द्यावा, असा अर्ज राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयात गुरुवारी सादर केला जाणार आहे. यानंतर अंतिम मान्यतेसाठी अर्ज आणि अहवाल नवी दिल्ली येथे सोमवार दि. 4 रोजी होणार्‍या नॅशलन हेरिटेज समितीच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनानेही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी परवानगी देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. परवानगीबाबत राज्याच्या महाअभियोक्‍ता यांंच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संबंधित सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत परवानगीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.