Thu, Aug 22, 2019 14:32होमपेज › Kolhapur › ठाकरे, आंबेडकर, ओवैसी, मुंडे यांच्या तोफा आज धडाडणार

ठाकरे, आंबेडकर, ओवैसी, मुंडे यांच्या तोफा आज धडाडणार

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:52AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने आणि दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाल्यामुळे स्टार प्रचारकांच्या तोफा शनिवारी (दि. 20) कोल्हापुरात धडाडणार आहेत. सायंकाळी सहा वाजता इचलकरंजी व रात्री आठ वाजता गडहिंग्लज येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व खा. असादुद्दीन ओवैसी यांची दुपारी चार वाजता गांधी मैदान व सायंकाळी सहा वाजता इचलकरंजी येथे, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची दुपारी तीन वाजता गारगोटी येथे सभा होणार आहे. 

महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यांतील वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शक्‍तिप्रदर्शन करत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या सभांच्या माध्यमातून होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.    

प्रचाराने आता शीग गाठली आहे. शेवटच्या टप्प्यात जोडण्यांबरोबर सभा घेण्यावरही उमेदवारांनी भर दिला आहे. स्टार प्रचारक मिळावेत यासाठी उमेदवारांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापैकी दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. तिसर्‍या टप्प्यात कोल्हापूरसह चौदा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांचे नियोजन केले होते. काही स्टार प्रचारकच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे आणि काही ठिकाणी विरोधकांचे आव्हान असल्यामुळे स्टार प्रचारक येऊ शकले नव्हते. दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात होणार्‍या मतदानाच्या ठिकाणी सभा लावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागांपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेसचे स्टार प्रचारक अद्यापही कोल्हापुरात आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत नाही. एका दिवसात पाच ते सहा सभा होणार आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, असादुद्दीन ओवैसी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.