Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Kolhapur › ब्लॉग : उद्धव ठाकरेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून बेदखल

ब्लॉग : उद्धव ठाकरेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून बेदखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विठ्ठल पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी कोल्हापूर दौर्‍यावर आल्याने त्यांच्या वक्‍तव्यांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. उद्धव यांनी प्रत्येक सभेत आणि बैठकीत भाजपचा खरपूस समाचार घेतला; पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बेदखल केले.

ठाकरे यांच्या दौर्‍याची सुरुवात शुक्रवारी सकाळी चंदगड तालुक्यातून झाली. हातकणंगले, करवीर, शिरोळ तालुक्यांतही जाहीर सभा घेतल्या. कोल्हापुरात व्यापारी, उद्योजक, कामगारवर्गाशी संवाद साधत आ. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त समारंभाला उपस्थित राहिले. या काळात त्यांनी निम्मा जिल्हा ढवळून काढला आणि लक्ष्य एकच ठेवले, ते म्हणजे भाजप. भाजप म्हणजे नवसाचे पोर, शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा पक्ष येथपासून ते भाजपबरोबरच्या सत्तेवर लाथ मारू येथपर्यंत त्यांनी अक्षरशः हल्ला चढविला. 

ठाकरेंच्या दौर्‍याचा सारांश पाहता त्यांनी केवळ राजकारण आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाषणबाजी केल्याचा राजकीय वर्तुळातून अर्थ काढला जात आहे. ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना असणारी मंत्रिपदाच्या घोषणेची अपेक्षाही हवेतच विरली. आता सहा आमदार आहेत, पुढच्या वेळी जिल्हाच ताब्यात द्या, तुम्हाला मंत्रिपद देतो, ही ठाकरे यांची घोषणा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. पक्षप्रमुख म्हणून त्यांची भूमिका अशी असेल, तर पुढे एकतरी आमदार हाताशी लागेल का, अशी शंका सेनेचे स्थानिक कार्यकर्तेच आपसात व्यक्‍त करू लागले आहेत. सहा आमदार; पण कार्यकर्त्यांची कामे शून्य, मग जिल्हा ताब्यात कसा मिळवायचा, असाच प्रश्‍न त्यांच्याकडून व्यक्‍त केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौर्‍यात सहकारपंढरीत आपला ठसा उमटविला. वारणानगर येथील मुक्‍त संवाद कार्यक्रमात त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली.  त्याचबरोबर शनिवारी कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या नामकरण समारंभातही ठाकरेंच्या टीकेची विशेष दखल घेतली नाही.