Tue, Jan 22, 2019 20:00होमपेज › Kolhapur › वस्त्रोद्योग जॉबवर्क वाहतुकीला ई-वे बिलातून सूट 

वस्त्रोद्योग जॉबवर्क वाहतुकीला ई-वे बिलातून सूट 

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:33AMइचलकरंजी : प्रतिनिधी

गुजरात व तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगातील जॉबवर्क वाहतुकीला ई-वे बिलमधून सूट देण्याची तत्त्वत: घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मुंबईत केली. 1 जुलैपूर्वी याबाबत सकारात्मक आदेश घेऊन शासन निर्णय जारी करण्याच्या सूचना त्यांनी जीएसटी आयुक्‍त जलोटा यांना केल्या असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

वस्त्रोद्योग हा वेगवेगळ्या प्रक्रियेने बनलेला असून, यंत्रमाग क्षेत्रातील कापड विणण्याच्या प्रक्रियेत सूत खरेदी, वार्पिंग, विणकाम, तपासणी, प्रोसेसिंग, प्रिंटिंग, एम्ब्रॉयडरी, रोलिंग अशा अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी यंत्रमागधारकांना जॉबवर्क करण्यासाठी मालाची 10 ते 25 किलोमीटरवर वाहतूक करावी लागते. या प्रत्येक प्रक्रियेवेळी ई-वे बिलनिर्मिती करणे अशक्य आहे. तसेच सुशिक्षित कामगार, इंटरनेट कनेक्शन व इतर सुविधा उद्योजकांकडे उपलब्ध नाहीत. जॉबवर्क वाहतुकीला ई-वे बिल प्रणालीतून सूट देण्यात यावी, अशी मागणी मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेऊन केली होती. त्यावेळी वित्तमंत्र्यांनी  सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले  होते. 

त्यानुसार आज मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातही वस्त्रोद्योगातील जॉबवर्क वाहतुकीला ई-वे बिल प्रणालीतून वगळण्याच्या सूचना केल्या. या निर्णयामुळे वस्त्रोद्योगातील यंत्रमागधारक, सायझिंगधारक, प्रोसेसर्स, तसेच व्यापारीवर्गाला दिलासा मिळाला आहे.