Sun, Mar 24, 2019 06:55होमपेज › Kolhapur › पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

खरीप हंगाम 2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शासनाकडून राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. भारतीय कृषिविमा कंपनी लि., यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन या पिकासाठी ही योजना असून प्रतिहेक्टरी विमा हप्ता व संरक्षित रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व झालेले नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत झालेले नुकसान, काढणीपश्‍चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींचा विमा संरक्षणात समावेश आहे. 

नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याला विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणेे, शेतकर्‍याला नावीन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव दाखल करण्याचा अंतिम दि. 24 जुलै आहे. 

या योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी संबंधित वित्तीय संस्था, मंडल कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.