होमपेज › Kolhapur › ‘दौलत’ चालविण्यास देण्यासाठी पुन्हा निविदा?

‘दौलत’ चालविण्यास देण्यासाठी पुन्हा निविदा?

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास दिलेल्या न्युट्रियन्स कंपनीबरोबरचा करार रद्द करून हा कारखाना पुन्हा भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी अगर विक्रीसाठी पुन्हा निविदा काढण्याच्या हालचाली जिल्हा बँकेत सुरू आहेत. शुक्रवारी जिल्हा बँकेत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

दौलत कारखान्याकडे 67 कोटींची थकबाकी होती. यामुळे हा कारखाना बँकेने विक्री अगर भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. 11 वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे अखेर गोकाक येथील न्युट्रियन्स अ‍ॅग्रो फु्रटस या कंपनीला 45 वर्षांच्या भाडे कराराने हा कारखाना चालविण्यास दिला. जुलै 2016 मध्ये या कारखान्याचा ताबा कंपनीने घेतला. ताबा घेत असताना दोन टप्प्यात पैसे देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. पहिला हप्ता 16 कोटी 99 लाख आणि दुसरा हप्ता मार्च 2017 पर्यंत 16 कोटी 99 लाख द्यावयाचे ठरले होते. त्यानंतर पाच वर्ष समान हप्त्यात उर्वरित रक्कम द्यायाची होती. न्युट्रियन्सने करारानुसार पहिल्या हप्त्यातील 34 कोटी रुपये दिले; पण त्यानंतर अडचणी निर्माण होत गेल्या. 

कारखान्याकडे 1 लाख 12 हजार क्विंटल साखर शिल्लक होती. त्यावर बँकेने साखर तारण पंधरा कोटींची उचल दिली होती. पण शेतकर्‍यांच्या उसाचे पैसे थकल्याने कंपनीने 11 हजार साखर पोत्यांची परस्पर विक्री केली. यामध्येही कंपनीने बँकेची फसवणूक केली म्हणून करार रद्द करण्याचा विचार संचालकांनी सुरू केला होता; पण कंपनीने पैसे भरतो म्हणून सांगितले होते, पण पैसे भरलेच नाहीत. 

आता कंपनीकडून साडे आठ कोटी रुपये येणे आहे. त्याशिवाय मालतारण कर्ज थकल्यामुळे ते बँक खाते एन.पी.ए.मध्ये गेले आहे, त्यामुळे बँकेला साडे तीन कोटी रुपयांची एनपीएची तरतूद करावी लागली आहे, अशा पद्धतीने दौलत साखर कारखान्याच्या कर्जामुळे बँक आणखी अडचणीत येत आहे. यामुळे न्युट्रियन्स कंपनीबरोबर करार रद्द करण्याबाबत वर बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.