Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील दहा संस्थांकडे १०४ कोटी थकीत

जिल्ह्यातील दहा संस्थांकडे १०४ कोटी थकीत

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 12:48AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा मोठ्या थकबाकीदारांच्या 104 कोटी रुपयांच्या वसुलीबाबत कठोर  भूमिका घेण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. या संस्थांत तंबाखू संघ, एस. के. पाटील बँक, राधानगरी मका प्रक्रिया संस्था आदींचा समावेश आहे. 

या थकबाकीदारांच्या याद्या वर्तमानपत्रे व मोठे डिजिटल बोर्ड उभारून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच गांधीगिरीने त्यांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात जाणार असल्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. त्यांच्याकडून वसुलीसाठी सहकार्य न मिळाल्यास त्यांची प्रॉपर्टी लिलावात काढण्याची कठोर भूमिकाही बँक घेईल. अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या औद्योगिक कर्ज व ग्रामीण कारागीर योजना समितीच्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने झाला. 

बँकेची सन 2017-18 ची वसुली उत्कृष्ट असतानाही दहा मोठ्या थकबाकीदार संस्थांनी मात्र बँकेला वसुलीच्या कामात सहकार्य केले नाही. या दहा संस्थांकडे 31 मार्च 2018 अखेर तब्बल 104 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी 33 कोटी 70 लाख रुपये राधानगरी मका प्रक्रिया संस्थेकडे, तर 27 कोटी 12 लाख रुपये तंबाखू संघाकडे आहेत. या प्रमुख थकबाकीदार संस्थांसह इतरही विविध थकबाकीदार सहकारी संस्थांबाबतीतही बँकेने हेच धोरण अवलंबले आहे.

थकबाकीदार संस्था व कर्ज (आकडे कोटीत)

1) शेतकरी सहकारी तंबाखू खरेदी-विक्री संघ लि. - कोल्हापूर - 27.12, 
2) राधानगरी तालुका सहकारी मका प्रक्रिया (स्टार्च) संस्था मर्या. - ठिकपुर्ली - 33.70, 3) विजयमाला बाबुराव देसाई सहकारी वाहतूक संस्था मर्या. - मडिलगे बुद्रुक - 10.80, 4) शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्या. - हेरवाड - 6.14, 5) भोगावती शेतकरी सहकारी कुक्कुटपालन संस्था मर्या. - परिते - 6.28, 6) हिरण्यकेशी शेतीमाल सहकारी प्रक्रिया संस्था मर्या. - निलजी - 8.58,  7) महाराष्ट्र स्टेट को-ऑप. टोबॅको फेडरेशन - मार्केट यार्ड, कोल्हापूर - 3.70, 8) मयूर सहकारी वाहतूक संघ मर्या. - कोल्हापूर - 2.51, 9) पंत सहकारी वस्त्रोद्योग प्रोसेस संस्था लि. - तिळवणी - 2.87, 10) श्री. एस. के. पाटील सहकारी बँक लि.- कुरूंदवाड - 2.38.