Mon, May 20, 2019 18:05होमपेज › Kolhapur › तेजस्विनीला पदक; कोल्हापुरात जल्‍लोष

तेजस्विनीला पदक; कोल्हापुरात जल्‍लोष

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 13 2018 12:43AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया)  येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. यात मराठमोळ्या महाराष्ट्रासह क्रीडानगरी कोल्हापूरचे खेळाडू मागे नाहीत. कोल्हापूरची सुवर्ण कन्या तेजस्विनी सावंत हिने गुरुवारी नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाचा वेध घेतला. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तिने हे यश संपादन केले. 

या यशाबद्दल क्रीडानगरी कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला. ती राहत असणार्‍या एस.एस.सी. बोर्ड परिसरातील घरासमोर क्रीडाप्रेमींनी  तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत, पती समीर दरेकर यांच्यासह कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फटाके वाजवून साखर-पेढे वाटण्यात आले. तेजस्विनीसह कोल्हापूर-महाराष्ट्र आणि देश गौरवाच्या घोषणा देत तिरंगा ध्वजही फडकविला. तेजस्विनीच्या यशाबद्दलची माहिती मिळताच शहरात ठिकठिकाणी असणार्‍या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात (शूटिंग रेंज) नवोदित नेमबाजांनी जल्लोष करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर श्री नेताजी तरुण मंडळ व केएसडीआय आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या दरम्यान तेजस्विानीचे आवर्जून कौतुक करण्यात आले. सोशल मीडियावरही तेजस्विनीवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
तेजूकडून अशीच देशसेवा घडावी तेजस्विनीने आजअखेर तीन राष्ट्रकुल स्पर्धा खेळल्या आहेत. यापैकी एकाही स्पर्धेत तिला अपयश आले नाही. प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पदक घेतलेच. याशिवाय इतर स्पर्धांतही पदकांची कमाई सुरूच ठेवली. तेजूच्या हातून भविष्यातही अशीच देशसेवा घडावी, अशी अपेक्षा तेजस्विनीच्या आई श्रीमती सुनीता सावंत यांनी व्यक्‍त केली. 

Tags : Kolhapur, Tejaswini, wins,  Medal,  commonwealth  Game